आयपीएल 2023 मध्ये सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईने
आपल्या घरच्या प्रेक्षकांना हंगामातील पहिल्या विजयाची भेट दिली.
चेन्नई सुपर किंग्स संघ तब्बल चार वर्षानंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे या सलामी जोडीने चेन्नई संघाला शतकी भागीदारी करून दिली. ऋतुराजने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण करताना 31 चेंडूवर 57 धावांची वादळी खेळी केली. तर कॉनवेने 47 धावा काढल्या. शिवम दुबे व मोईन अली यांनी अनुक्रमे 27 आणि 19 धावांचे योगदान दिले. अखेरीस रायडूने 14 चेंडूवर नाबाद 27 व धोनीने 2 षटकारांच्या मदतीने 3 चेंडूंमध्ये 12 धावा करत संघाला 7 बाद 217 पर्यंत मजल मारून दिली. लखनऊ संघासाठी मार्क वूड व रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनऊसाठी कर्णधार केएल राहुल व कायले मेयर्स यांनी सुरुवात केली. मेयर्सने आपल्या सलग दुसऱ्या सामन्यात मैदानावर अक्षरशः वादळ आणले. त्याने 22 चेंडूवर तुफानी 53 धावा कुटल्या. तो बाद झाल्यानंतर मात्र लखनऊचा डाव कोसळला. मोईन अलीने चार बळी मिळवत पाहुण्या संघाच्या डावाची वाताहात केली. त्याला सेंटनर व जडेजा यांनी चांगली साथ दिली. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी थोडाफार संघर्ष केला. मात्र, ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. अखेरीस लखनऊला स्पर्धेतील पहिला पराभव पहावा लागला.