राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 13 आणि 15 एप्रिलला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात आगामी पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. अवकाळी पावसामुळे वर्षभर मेहनतीनं पिकवलेलं सोन्यासारखं पिकं मोतीमोल झालंय.. शेतमालाचं झालेलं प्रचंड नुकसान पाहून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.