काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आज (12 एप्रिल) 51 व्या वर्षात पर्दापण करत आहेत. यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापुरात कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिकांची गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ सत्ता असलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना राजाराम साखर कारखान्याच्यानिवडणूक प्रचाराची झलक सुद्धा दिसून आली.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी राजाराम कारखान्याच्या प्रचाराची किनार पाहायला मिळाली. व्यासपीठासमोर ऊस ठेऊन त्यावर ‘कंडका पाडायचाच’ असा केलेला उल्लेख फलक चांगलाच लक्षवेधी ठरला. सकाळपासून सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होत होती. मात्र, या निमित्ताने सतेज पाटलांनी निवडणुकीच्या प्रचाराची संधी सोडली नाही.
सतेज पाटील म्हणाले की, “दरवर्षी वह्यांच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारतो. राजाराम कारखान्याच्या बाबतीत लोकांमंध्ये उत्सुकता आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजारामसाठी शुभेच्छा देत आहेत यावरुन कल लक्षात येतो.”