आयपीएल 2023 मोसमातील 19 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादकडून कोलकाता संघाला 229 धावांचं लक्ष्य मिळाले होते. पण कोलकाताला 20 षटकात 7 गडी गमावून 205 धावांपर्यंतच मजल मारता आली. या रोमांचक सामन्यात हैदराबादने कोलकातावर 23 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या आयपीएल च्या 16 व्या मोसमातील हैदराबाद संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. हैदराबाद मयंक मार्कंडेने पुन्हा एकदा गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्याच्या शेवटच्या षटकात कोलकाताच्या संघाला विजयासाठी 32 धावांची गरज होती पण त्यांना केवळ 8 धावा करता आल्या. यामुळे या सामन्यात गोलंदाजांची भूमिका फार महत्त्वाची होती. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सामन्या दरम्यान काही चुकाही घडल्या. फिल्डीदरम्यान झेल घेण्याच्या अनेक संधी हैदराबादने गमावल्या. नाहीतर केकेआरचा संघ 200 चा आकडाही गाठू शकला नसता. हैदराबादकडून मार्को जॅनसेन आणि मयंक मार्कंडेने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
कोलकाताकडून फलंदाजी करताना कर्णधार नितीश राणाने 41 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकार ठोकत 75 धावांची दमदार खेळी केली. त्याशिवाय कोलकाताच्या गेल्या सामन्यातील ‘हिरो’ रिंकू सिंहनं दमदार अर्धशतकी खेळी केली. रिंकूनं 31 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. मात्र, तरीही कोलकाता संघ घरच्या मैदानावर पराभूत झाला. 229 धावांचं लक्ष्य गाठताना कोलकाता फक्त 205 धावा करु शकला आणि हैदराबाद संघाने 23 धावांनी हा सामना जिंकला.
या सामन्यात 229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात खूपच खराब झाली. शून्य धावसंख्येवर संघाला पहिला धक्का बसला. रहमानउल्ला गुरबाजच्या शून्यावर बाद झाला. यानंतर 20 धावांवर संघाला व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायण यांच्या रूपाने दोन मोठे धक्के बसले. यानंतर कोलकाता संघाचा कर्णधार नितीश राणाने डाव सांभाळला.
कर्णधार नितीश राणाने नारायण जगदीशनसोबत डाव सांभाळला. त्यांनी पहिल्या 6 षटकांत धावसंख्या 62 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नितीश आणि जगदीशन यांच्यात चौथ्या विकेटसाठी 29 चेंडूत 62 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. या सामन्यात 21 चेंडूत 36 धावांची खेळी करून जगदीशन तंबूत परतला. त्यानंतर कोलकाता संघाला 82 धावांवर चौथा धक्का बसला.
कोलकाताच्या संघाला 96 धावांच्या धावसंख्येवर आंद्रे रसेलच्या रूपाने पाचवा धक्का बसला. रसेल केवळ 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर नितीश राणाला रिंकू सिंगची साथ लाभली आणि दोघांनी मिळून वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 29 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. 41 चेंडूत 75 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून करून नितीश राणा पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार नितीश राणाच्या रूपाने कोलकाताच्या संघाला 165 धावांवर सहावा धक्का बसला.



