फुटबॉल सामन्यादरम्यान आपल्या पेठेतील टीम हारल्यानंतर जल्लोष केल्याचा कारणातून भोईगल्ली येथील दोन तरुण मंडळांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये दोन्हीकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये तीघेजण जखमी झाले असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. भोईगल्ली रस्त्यावर विटांचा व दगडांचा खच पडला होता. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते.
रविवारी पाटाकडील तालीम व दिलबहार तालीम संघामध्ये इंगवले चषक सामन्यातील उपांत्यपूर्व फेरीतील सामना पार पडला. यामध्ये पाटाकडीलने दिलबहारचा पराभव केला. या सामन्यादरम्यान भोईगल्ली येथील भोई तालमीच्या अभय पोवार याच्याशी त्याच गल्लीतील न्यू स्टार फ्रेंड सर्कलमधील एका मुलासोबत वाद झाला. सामना संपल्यानंतर दिलबहार तालीम परिसरात पुन्हा त्यांच्यात मारामारी झाली. या घटनेचे पडसाद रविवारी सायंकाळी भोईगल्ली परिसरात उमटले. गल्लीत आलेल्या अभय पोवार याच्यावर न्यू स्टार फ्रेंड सर्कलच्या सात ते आठ तरुणांनी हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. दोन्ही गटाकडून परस्पर दगड तसेच वीटा भिरकावण्यात आल्या. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या हल्ल्याची माहिती मिळतात लक्ष्मीपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी शहर पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी भेट दिली. दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत अन्य जखमींची माहिती मिळू शकली नाही. मात्र त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.