संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक गटाने २९ पैकी २१ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. उत्पादक गटातील लढतीमध्ये गट नंबर दोन मधील अमल महादेवराव महाडिक यांनी ६९३६ इतकी सर्वाधिक मते घेतली सत्ताधारी आघाडी सर्वसाधारणपणे १३०० हून अधिक मताधिक्याने विजयी झाली.
छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण महाडिकांनीच आमदार सतेज पाटील यांचाच कंडका पाडला आहे. राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण करूनही महादेवराव महाडिकांची सरशी झाली आहे कारखान्याच्या सर्वच गटातून महाडिक गटाने बाजी मारली आहे. सरासरी तेराशे मतांनी उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीत
सर्व ६ गटात महाडिक गटाने सुमारे एक हजार मतांची आघाडी घेतली होती.
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाडिक समर्थकांचा जल्लोष
संस्था गटातून सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक विजय झाल्यानंतर कारखाना कार्यस्थळावर महाडिक समर्थकांनी एकच जल्लोष केला. महाडिक- महाडिक धूमधडाका अशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांनी, खासदार धनंजय महाडिक, सत्ताधारी आघाडीचे नेते अमल महाडिक यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक, प्रा. जयंत पाटील, पृथ्वीराज महाडिक यांच्यासह कार्यकर्ते गुलालात न्हाहले होते. कार्यकर्त्यांनी उघड्या जीपमधून नेत्यांची जल्लोषी मिरवणूक काढली.
चुरशीने ९९ टक्के मतदान झाले होते. अ’ वर्ग एकूण १३ हजार ५३८ सभासदापैकी १२ हजार ३३६ इतके मतदान झाले. संस्था गटात १२९ पैकी १२८ मतदान झाले होते. महादेवराव महाडिक संस्था गटातून विजयी होत त्यांनी महाडिक गटाची विजयी सलामी दिली. महादेव महाडिक यांना पहली ८३ मते तर विरोधी गटातील सचिन पाटील यांना ४८ मते पडली आहेत. तर उत्पादक सभासदांच्या सर्व सहाही गटामधून महाडिक गटाने विजय मिळवला आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ खरे, पी. एम. मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. १ ते २९ मतदान केंद्रावरील मतदानाची मोजणी पहिल्या | फेरीत झाली. या फेरीमध्ये पहिल्यापासूनच सत्ताधारी महाडिक गट आघाडीवर राहिला. पहिल्या फेरीतील मतमोजणीत वडणगे, निगवे दुमाला, शिवे भुये, भुयेवाडी, वडगाव, नरंदे, कुंभोज, चंदुर, रुकडी माणगाव, भेंडवडे या गावांचा समावेश होता.
पहिला फेरीमध्ये सत्ताधारी आघाडीचे सर्व उमेदवार आठशे ते अकराशे इतक्या मताधिक्याने आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी आघाडीने मताधिक्य घेतल्यामुळे समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली. दसऱ्या फेरीमध्ये शिरोली, कसबा बावडा राजाराम साखर कारखाना निवडणूकीची मतमोजणी सुरू असताना गडमुडशिंगी, वाशी, बाजारभोगाव, कांडगाव, धामोड, कळंबा, येवलुज पन्हाळा, गगनबावडा आणि शाहूवाडी तालुक्यातील गावांचा समावेश होता. दुसऱ्या फेरीत सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यामध्येही त्यांना मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणीही महाडिकांनी मते घेतली. दुसरीकडे शिरोली पुलाची महाडिकांच्या बालेकिल्ल्यामध्ये महाडिकांना भरपूर मतदान मिळाले. मात्र तुलनेत पाटील यांना तो किल्ला भेदता आला नाही. महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक यांनी या विजयाचे श्रेय सर्व सभासदांना दिले आहे. शिवाय महादेवराव महाडिक यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला असून, या निकालानंतर राजकीय समीकरणे बदलतील, असेही जाहीर
करून टाकले.
विजयी उमेदवार मिळालेली मते उत्पादक गट १) विजय भोसले – ६८०३, संजय मगदूम – ६६५१, शिवाजी पाटील- ६६९२, सर्जेराव भंडारे – ६५९८, अमल महाडिक – ६९३६, विलास जाधव – ६५४८, डॉ. मारुती किडगावकर- ६७६०, सर्जेराव पाटील (बोणे) ६४४६, तानाजी पाटील-६६३६, दिलीपराव पाटील – ६६६५, मीनाक्षी पाटील – ६५९३, दिलीप उलपे – ६७४२, नारायण चव्हाण – ६५४५, गोविंद चौगले – ६७५५, विश्वास बिडकर ६६१०. संस्था गट महादेवराव महाडिक- ८३.
महिला राखीव गट
कल्पना पाटील ६८११, वैष्णवी नाईक -६८३४. इतर मागास प्रतिनिधी गट- संतोष पाटील- ६८७०, अनुसूचित जाती जमाती गट- नंदकुमार भोपळे- ६५९९, भटक्या विमुक्त जाती जमाती गट- सुरेश तानगे – ६८८४.