राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार की, काय? असं बोललं जात आहे. त्याला कारण आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेलं वक्तव्य. ठाकरे गटात उरलेले सर्वच्या सर्व 13 आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. अशातच उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांनी जोर धरला आहे.
उदय सामंत यांनी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटातील उरलेले 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा अनेक चर्चा सुरू आहेत, असं उदय सामंत म्हणाले. खारघर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवलं जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे, याबाबत प्रश्न विचारला असता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तसेच, यावेळी उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणाही साधला आहे.
संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणं मी आता सोडून दिलेलं आहे. त्यांच्या समोर स्पर्धक म्हणून जगात एकही विद्वान शिल्लक राहिला नाही. देशातील सगळ्या विद्वानांचे राऊत हे महामेरू बनलेले आहेत. जगातील विद्वानांपेक्षा राऊत यांना जास्त अक्कल आहे, त्यांच्यावर काय बोलायचं? अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी सरकारी कागद दाखवून शहाणपणा दाखवू नये, अशी टीका उदय सामंत यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरुन पायउतार व्हावं लागणार असून राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांकडून राज्यभरात ‘अजित दादा भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स संपूर्ण राज्यभरात झळकवण्यात आले आहेत.