पाचगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मगदूम कॉलनी इथं आठ दिवसांपासून मध्यरात्री दोन ते साडेतीनच्या दरम्यान घराच्या छतावर मोठे दगड पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण टेरेसवर झोपतात. आशा प्रकाराने दगड लागून नागरिक जखमी होण्याचीही शक्यता आहे. ज्यावेळी दगड पडतात त्यावेळी घराबाहेर पडणे भीतीदायक असल्याने अज्ञात व्यक्ती हा डाव साधून गायब होत असल्यानं स्थानिकांना त्याचा पत्ता लागत नाही. पोलिसांनी परिसरात गस्त वाढविण्याची गरज आहे.
मगदूम कॉलनी हा दाट वस्तीचा परिसर असून, पश्चिमेला माळरान असल्याचा फायदा घेऊन अज्ञातांकडून असे प्रकार घडत आहेत. छतावर दगड, वीटा आणि फरशीही पडत आहे.
या परिसरामध्ये आठ दिवसांपासून घरावर दगड पडण्याचे प्रकार सुरू आहेत. स्थानिक तरुणांकडून गस्त सुरु आहे. परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती दखल घेऊन परिसरात गस्त घालावी.