संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. संसदेचे मॉनसून सत्र २० जुलैपासून सुरु होईल.
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी अशी माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “२०२३चे संसदेचे मान्सून सत्र २० जुलैपासून सुरु होईल आणि ते ११ ऑगस्टपर्यंत चालेल. २३ दिवस चालणाऱ्या या सत्रात एकूण १७ बैठका होतील. त्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांना संसदेच्या कायदेविषयक आणि अन्य कामकाजामध्ये सहभागी होण्याची विनंती करतो. “
संसदेच्या या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्याचे विधेयक देखीस याच अधिवेशनात आणण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनातच समान नागरी कायद्याचे विधेयक सभागृहात मांडले गेले तर यावर असलेल्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे यावरून जोरदार गदारोळ होऊ शकतो.
तसेच दिल्लीतील केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचे पडसाद देखील या अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणी नायाब उपराज्यपाल यांना अधिकार देण्याच्या विधेयक संसदेतील घमासानाचे कारण ठरू शकते. या दोन मुद्द्यांवर हे अधिवेशन चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
२० जुलैपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे, हे सत्र नुकतेच उद्घाटन झालेल्यान नवीन संसद भवनात होणारे हे पहिलेच अधिवेशन ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं नुकतंच उद्धाटन झालं होतं. दिल्लीतील या नव्या संसद भवनात प्रत्येक मंत्र्यासाठी स्वतंत्र कार्यालय असणार आहे. याशिवाय प्रत्येक पक्षाला देखील वेगळं कार्यालय दिलं जाणार आहे.