राज्यातील शिवसेना (Shiv Sena), भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादी (NCP) सहभागी झाली आहे. या सरकारमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मंत्री झाल्यानंतर मुश्रीफ हे शुक्रवारी (ता.७) पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहेत.
त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे ताराराणी चौकात आगमन होणार आहे. त्याठिकाणी जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर रॅलीने ते दसरा चौकातील शाहू महाराज पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.
तेथून राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिवाजी पुतळ्यास अभिवादन करुन बिंदू चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. तेथून अंबाबाई मंदिरात दर्शन घेवून ही रॅली कागलला रवाना होणार आहे.
कागल येथे दुपारी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री झाल्यानंतर मुश्रीफ पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने ठिकठिकाणी स्वागत कमानी व होर्डिंग उभारली जाणार आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात होर्डिंग लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.