अंदमान निकोबार बेटावर शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेजच्या अनुमानानुसार या भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता 5.8 एवढी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत 10 किलोमीटरवर होता. या भूकंपामुळे अंदमान निकोबार हादरून गेलं आहे. भूकंपाचे झटके जाणवताच लोक घाबरून गेले. जीवमुठीत घेऊन हे लोक घराच्याबाहेर पळाले. मात्र, या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवीत वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक भयभीत झाले होते.
शनिवारी रात्री उशिरा 1 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी लोक गाढ झोपेत होते. अचानक धरती हल्ल्याने घरातील भांड्यांची पडझड झाली. त्यामुळे लोकांना जाग आली. भूकंपाचे धक्के जाणवल्याचं लक्षात येताच या लोकांनी तात्काळ घरातून पळ काढला. आहे त्या अवस्थेत लोक घराबाहेर पडले. रस्त्यावरच त्यांनी आसरा घेतला. लोक भयभीत झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता दिसत होती. बराच काळ या लोकांनी कुटुंबकबिल्यासह रस्त्यावर काढला. त्यानंतर भूकंपाचा पुन्हा धक्का बसला नसल्याचं लक्षात आल्यानंतर लोक आपआपल्या घरात गेले.