जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. आज (ता.१) जिल्ह्यात ग्रीन अलर्ट (Green Alert) दिला असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात सरासरी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.सकाळी सहा वाजता ३७ फूट १ इंच असणारी पाणीपातळी रात्री ९ वाजता ३४ फूट २ इंचापर्यंत खाली आली आहे. पंधरा तासांत तीन फूट पाणी पातळी कमी झाली आहे. राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) तीन स्वयंचलित दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत.
धरणातून एकूण ५६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे, तर जिल्ह्यात २७ बंधारे पाण्याखाली आहेत.कुंभी प्रकल्पांतर्गत कळे बंधाऱ्यावरील पाणी ओसरले आहे. तसेच, जिल्ह्यात मागास असणाऱ्या पेरण्या आता अंतिम टप्प्याकडे जात आहेत. मागास होणाऱ्या पेरण्यांना पावसाळ्यानंतरही काळजी घ्यावी लागणार असल्याची परिस्थिती आहे. कोल्हापूर शहरातील गायकवाड वाड्याजवळ आलेले पाणी आता पात्राकडे जात आहे. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे, तो रस्ता शेवाळल्याने महानगरपालिकेने हे शेवाळ काढून वाहतुकीसाठी सुरक्षित केले आहे.धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) राधानगरी ८.३६ ८.३४ तुळशी ३.४७ २.२५ वारणा ३४.३९ २९.१३ दूधगंगा २५.३९ १७.६२ कासारी २.७७ २.२८ कुंभी २.७१ २.२८ पाटगाव ३.७१ ३.०७