राष्ट्रवादीत बंडाळी करून पक्षावर दावा केलेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात झालेल्या वाटाघाटीनुसार संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान होणार अशा चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. अजित पवार यांचे समर्थक, कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून झळकावले जातात. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांकडून देखील सातत्याने वेगवेगळ्या तारखा देण्यात येतात. मात्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेत आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. 2019 सालापासून राज्यातील जनतेने अनेक बदल पाहिले आहेत. आता मात्र कोणतेही बदल होणार नाहीत, असे म्हणत अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस आज सभागृहात बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 साल हे खास वर्ष आहे. 2019 साली अनेक विक्रम झाले. एक विक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे. 2019 सालचे हिरो एकनाथ शिंदे आहेत आणि आता दुसरे हिरो अजित पवार आहेत. अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर परत उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले आणि आता उपमुख्यमंत्री झाले. राज्याच्या जनतेने अनेक बदल पाहिले आता मात्र कोणताही बदल होणार नाही.
मुख्यमंत्रीपदाबाबत स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर देखील प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडली आहे.आज तर थेट त्यांनी विधानसभेतच आपली भूमिका मांडली आहे . दोन दिवसापूर्वी पुणे दौऱ्यात देखील अजित पवारांनी आपली बाजू मांडली होती. अजित पवार म्हणाले होते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत.मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी म्हणून काम करतोय. त्यामुळे आम्हाला मिळालेली जबाबदारी तर नीट पार पाडू द्या. कार्यकर्त्यांचं समाधान होण्याकरता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले असावेत.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने, विद्यमान मुख्यमंत्री लवकरच पदावरून बाजूला होतील आणि त्यांच्या जागी पवार येतील, अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राज्यात येत्या काळात आणखी एक राजकीय अंक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.