मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना आवाहन; म्हणाले ‘आम्ही अजित पवारांना…’
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू केलं त्याचा आजचा १४ वा दिवस आहे. राज्य सरकार त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, मात्र, त्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी कालपासून पाणी पिणं आणि औषधं घेणंही बंद केलं आहे. त्यांनी सलाईनही काढलं आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी सरकारच्या बैठकांवर बैठका पार पडत आहेत. मात्र, अद्यापही त्यावर अंतिम तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी जालन्यात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करत आवाहन केलं आहे.मनोज जरांगे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘आमच्याविरोधात जे बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणका असा आहे. त्यामुळं जो बोलत नाही त्याला का विनाकारण लक्ष्य करायचं, मग तो कोणी का असेना. मात्र, जे सत्तेत आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा हा त्यांना आमचा संदेश आहे’, असं ते म्हणाले आहेत.पुढे मनोज जरांगे म्हणाले की, ‘अजित पवार कमी पडलो असं म्हणाले होते. आता आम्ही त्यांना विनंती करतो, त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन आरक्षणाचा विषय लावून धरावा. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण द्यावं. गोरगरिबाचं कल्याण करावं. दुसरी आमची काहीही मागणी नाही. आमच्या गोरगरिबांचा आक्रोश त्यांच्या लक्षात येत असेल,’ असं आवाहन मनोज जरांगे यांनी यावेळी केलं आहेतर आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीबाबत जरांगे म्हणाले की, ‘आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. विरोध म्हणून उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीला जाऊ नका, आमचा आक्रोश घेऊन बैठकीला जा. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तर तुमच्यासमोर नतमस्तक होईन. तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही. अजित पवार यांनीच सर्व पक्षीय नेते गोळा करून गरिबांच्या लेकरांना न्याय द्यावा’.