देशभरात आजकाल डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अगदी प्रत्येक गोष्टीसाठी आपण कॅश देण्याऐवजी ऑनलाइन पेमेंट करतो. यासाठी आपण गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि अन्य Apps चा वापर करतो. युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI होय. युपीआयने अलीकडेच १० अब्ज व्यवहारांचा टप्पा पार केला आहे. आता वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट करणे आणखीन सोपे करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आरबीआयचे गव्हर्नर यांनी ‘UPI Lite X’ नावाचे एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. हे फिचर कसे काम करते आणि या फीचरमुळे वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट करणे कसे सोपे होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय लाइट एक्स फिचर लॉन्च केले आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय म्हणजेच ‘ऑफलाइन’ पद्धतीने पेमेंट पाठवता येणार आहे आणि पेमेंट स्वीकारता येणार आहे. शक्तिकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३ दरम्यान हे फिचर प्रदर्शित केले आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.इंटरनेटशिवाय पेमेंट करता येणार
”युपीआय लाइटच्या सुविधेनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑफलाइन पेमेंटसाठी युपीआय लाइट X लॉन्च केले आहे. या फीचरद्वारे वापरकर्ते आता पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने पेमेंट करू शकणार आहेत आणि स्वीकारू शकणार आहेत. म्हणजेच आता तुमचे इंटरनेट नीट काम करत नसेल किंवा नेटवर्क नीट चालत नसेल तरीही तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकणार आहात.” NPCI ने एक निवेदन जारी केले.
नक्की काय आहे युपीआय लाइट X ?
युपीआय लाइट एक्स फिचर वापरकर्त्यांना भूमिगत स्टेशन्स किंवा कनेक्टिव्हीटी नसलेल्या भागांमध्ये देखील व्यवहार करण्यास सक्षम करते. इंटरनेट बंद असताना आणि ऑफलाइन व्यवहार प्रत्यक्षात करण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरते. युपीआय लाइट एक्स हे नियमित युपीआय लाइट पेक्षा वेगळे आहे. नियमित ईपीआय लाइटच्या मदतीने तुम्ही बँक अकाउंट्समध्ये कधीही आणि कुठेही पैसे पाठवू शकता. युपीआय लाइट हे लहान व्यवहारांसाठी आहे. मात्र युपीआय लाइट एक्स फिचरच्या मदतीने व्यवहार करत असताना पैसे पाठवणार आणि स्वीकारणारा एकमेकांजवळ असणे आवश्यक आहे