Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगतुमचा आदेश उसाच्या सरीत गाडतो, हिम्मत असेल तर अडवून दाखवा, राजू शेट्टी...

तुमचा आदेश उसाच्या सरीत गाडतो, हिम्मत असेल तर अडवून दाखवा, राजू शेट्टी भडकले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात ऊस निर्यात करण्यास महाराष्ट्र सरकारने बंदी घातली असून या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार विरोध केला आहे. तुमचा आदेश उसाच्या सरीत गाडतो, असे सांगतानाच हिम्मत असेल तर ऊस अडवून दाखवा, असा इशाराच संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

यावर्षी राज्यात उसाची लागवड कमी झाली असून पावसाअभावी ऊसाची वाढ ही खुंटणार आहे. यामुळे साखर कारखान्यांना ऊस कमी पडणार आहे. या पार्श्वभूमीवर परराज्यात ऊस निर्यात करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. राज्यातील साखर कारखान्यांना ऊस मिळावा हा या मागचा हेतू आहे, पण या निर्णयास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे.

संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस, ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मानून महाराष्ट्राचे विकासाभिमुख काम करत आहेत असा त्यांचा दावा आहे. त्या मोदी सरकारने ‘वन नेशन वन मार्केट’चे धोरण अवलंबले आहे. त्याला शेतीतील कोणतीही शेती उत्पादने व पिके अपवाद नाही. मग महाराष्ट्रातील ऊस शेजारच्या राज्यात निर्यात करणार नाही अशी भूमिकाच ट्रिपल इंजिन सरकारने कशी घेतली? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

एक तर केंद्र सरकारच्या धोरणावर आमचा विश्वास नाही, असं सरकारने जाहीर करावं अथवा परराज्यातील ऊस निर्यातबंदीचा आदेश मागे घ्यावा. मुळामध्ये असे निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे का याचे आत्मपरीक्षण सरकारने करावे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही मागील तीन वर्षाचा हिशोब साखर कारखानदारांकडून घेऊ शकलेले नाही. तो हिशोब जर घेतलेला असता तर शेतकऱ्यांना एफआरपीहून अधिक पैसे शेतकऱ्यांना मिळाले असते. राज्य सरकारला शेजारच्या राज्यात ऊस पाठवू नये, असे सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. या आदेशाला आम्ही उसाच्या सरीत गाडून टाकून आम्हाला ज्या ठिकाणी चांगला भाव मिळेल तिथे आम्ही पाठविणार हिम्मत असेल तर तुम्ही अडवून दाखवा, असं चॅलेंजच त्यांनी सरकारला दिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -