आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे. यावेळी नेहा ठाकूरने महिलांच्या नौकानयन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचे हे पहिले पदक आहे. भारताने आतापर्यंत एकूण १२ पदके जिंकले आहेत. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने 2 सुवर्णांसह 11 पदके जिंकली होती. तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून अनेक पदकांची अपेक्षा आहे.तुलिका मान ज्युदोमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत पोहोचली असून येथे विजय मिळवून ती कांस्यपदक जिंकू शकते.
तुलिका मानने तिची रिपेचेज फेरी चायनीज तैपेईच्या जिया वेन त्साय विरुद्ध इप्पॉनने जिंकली आणि महिलांच्या +78 किलो गटात कांस्यपदकाच्या सामन्यात प्रवेश केला.तर हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने सिंगापूरविरुद्ध मोठा विजय नोंदवला आहे. आतापर्यंत पुरुष हॉकी संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी गट टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा 16-1 असा पराभव केला. या सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने चार गोल केले. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारताने उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव केला होता. भारतीय हॉकी संघाने गट टप्प्यातील दोन सामन्यांमध्ये एकूण 32 गोल केले आहेत. भारताचा पुढचा सामना जपानशी आहे.