इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमा अंतर्गत ‘एक तारीख एक तास’ या स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ मलाबादे चौकात करण्यात आला. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी नगरसेवक सागर चाळके यांच्यामध्ये जोरादार शाब्दीक खडाजंगी उडाली. त्यामुळे स्वच्छता मोहिमेपेक्षा राजकीय पदाधिकाऱ्यांमधील वाद शहरात चर्चेचा विषय ठरला होता.
महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांच्या सहभागातून सामूहिक स्वच्छता अभियानाचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या अभियानाची सुरुवात मलाबादे चौकात करण्यात आली. याप्रसंगी प्रारंभी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्वागत केले. त्यानंतर आयुक्त दिवटे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छतेबाबतची शपथ घेतली. त्यानंतर बोलताना आम प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणात मलाबादे चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्या संबंधी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. यावर आक्षेप घेत माजी नगरसेवक सागर चाळके यांनी स्वच्छतेशी संबंधित उपक्रम सुरु असताना पुतळा बसवण्याचे राजकारण कशासाठी असा सवाल केला.
तेव्हा आम. आवाडे यांनी चौकात कार्यक्रम होत आहे. त्या अनुषंगाने छ. संभाजी महाराज यांचा पुतळा याठिकाणी बसवण्यासंबंधी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे सांगत ज्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा आपण आपल्या भूमिकेशी ठाम आहोत, असे स्पष्ट करत आपले मनोगत आवरते घेतले. त्यामुळे स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमात नेतेमंडळीच्या वादाची चर्चा जोरदार रंगली.
त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने, भाजपा शहर अध्यक्ष अमृत भोसले, तानाजी पोवार, अनिल डाळ्या, विठ्ठल चोपडे, दिलीप मुथा, अब्राहम आवळे, डॉ सुनीलदत्त संगेवार यांचेसह महापालिका पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, शिक्षक, युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोहिमेत शहरात एकाचवेळी विविध ६२ ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.