राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी कोणाची? हा वाद आता निवडणूक आयोगात पोहोचला असून दोन्ही गटांकडून पक्षाचे नाव व चिन्ह यांवर दावा करण्यात आलाय.
अशातच आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.
अजित पवार यांनी पक्षामध्ये बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अजित पवार यांच्यापूर्वी स्वपक्षाला खिंडार पाडत भाजपसोबत घरोबा केलेले एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. अशात भाजप नेतृत्व लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, शिंदेंना हटवून पवारांना मुख्यमंत्रीपदी बसवणार का? असा प्रश्नही चर्चिला जातोय.
मात्र शरद पवार यांचे अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांवरील वक्तव्य त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण सोडणारे आहे. अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असल्याचं भाकीत शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांना आजतागायत राजकीय चाणक्य संबोधणारे मात्र आता अजित पवार गटात असलेले नेते त्यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी, अजित पवारांना नजीकच्या काळात मुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याच्या चर्चांच्या फुग्यातील हवा आधीच काढून घेतली आहे. ‘एकनाथ शिंदे हे कार्यकाळ पूर्ण करतील, अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आल्यानंतर ती पूर्ण ५ वर्ष देण्यात येईल.’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं.
अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले फ्लेक्स राज्यात ठिकठिकाणी झळकले. मात्र शरद पवारांचा हात सोडून भाजपशी जवळीक साधल्यानंतरही अजित पवार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ अद्याप पडू शकली नाही.