समृध्दी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या आगर सायगावमध्ये हा अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 22 जण जखमी झाले आहेत. या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या भीषण अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच पीएम केअर फंडमधूनही मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघाताबाबत ट्विट केलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाचं ट्विट
समद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला. या घटनेने मनाला अतिव दु:ख झालं. ज्यांनी आपल्या जवळची माणसं गमावली त्या कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रर्थना करतो. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएम केअर फंडमधून 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजारांची मदत केली जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समद्धी महामार्गावरच्या अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचं ते म्हणालेत. तसंच मृतांच्या नातेवाईकांनाही मदत केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सरकारने पावलं उचलावीत, असं म्हटलं आहे.शरद पवार यांचं ट्विट
समृद्धी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हिच प्रार्थना! समृद्धी महामार्गावर आजवर एकूण ७२९ अपघात झाले आहेत. यात २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत. तर ४७ अपघातांच्या घटनेत आजवर १०१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, या महामार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती पाऊले उचलली पाहिजेत.