Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगमराठा आरक्षण मिळवण्यासाठी काय-काय करावं लागेल? मनोज जरांगे यांच्या महत्त्वाच्या सूचना

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी काय-काय करावं लागेल? मनोज जरांगे यांच्या महत्त्वाच्या सूचना

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीत मराठा समाजाला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आता पुढची रणनीती काय असावी, काय करावं, याबाबत मनोज जरांगे यांनी मार्गदर्शन केलं. “मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. मी ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाच्या पुढे मी जात नाही. तुम्हालादेखील काही अटी आहेत. उद्या सकाळपासून आपले तालुक्यातील आणि जिल्ह्यातील गावं पिंजून काढायची. आपण आपले सर्कल आणि त्या सर्कलमध्ये येणारी गाव, त्या गावातील प्रत्येक मराठा कुटुंबाकडे जायचं, त्यांना आरक्षण समजवून सांगायचं की आरक्षण कशासाठी हवं आहे”, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

“आपण एकत्र का यायचं? हे समजावून सांगायचं. तिसरी गोष्ट आंदोलन करताना शांततेत करायचं. कुणी उद्रेक किंवा जाळपोळ करायचा नाही. त्याचं कारणही सांगतो. गोर गरीब मराठ्याच्या पोरांवर गुन्हे दाखल होतात. त्याच्या नोकरी आणि शिक्षणात अडचणी येतात. चौथी गोष्ट म्हणजे एकाही मराठ्या पोराने स्वत:ला संपवून घ्यायचं नाही. पोरंच मरायला लागले तर आरक्षण घ्यायचं कुणाला आणि द्यायचं कुणाला? आंदोलनाचा उपयोग काय? एकाही पोराने आत्महत्या करायची नाही”, अशी महत्त्वाची सूचना मनोज जरांगे यांनी दिली.

‘गाफील राहू नका’
“मी शांततेच्या आंदोलनानेच मराठा आरक्षण निर्णयापर्यंत आणलं आहे. हे शांततेचं युद्ध सरकारला 24 तारखेनंतर झेपणार नाही आणि पेलणारसुद्धा नाही. ताकदीने तयारी करायला सुरुवात करा. गाफील राहू नका. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. शिवाजी महाराजांचा एकही मावळा गाफील राहत नव्हता. सर्व गावांना भेटायचं आणि सर्व गावांना सावध करायचं”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“आंदोलनाची पुढची दिशा २२ तारखेला जाहीर सांगणार आहोत. कारण मराठे पाठीत खंजीर खुपसत नाहीत. सरळ सांगत असतात. आंदोलन शांततेत होणार आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार. मी हात जोडून सांगतो, सर्व पक्ष, गटतट सोडून द्या. ही संधी सोडू नका. अशी संधी पुन्हा येणार नाही. तुमचा मुलगा म्हणून आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही, हा शब्द देतो. फक्त आता मतभेद न मानता एकजुटीने सर्व सावध राहा. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -