मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी धाराशीवमध्ये तीन मुलांच्या पित्याने तर हिंगोलीत सुसाईड नोट लिहून तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनांना काही तास उलटत नाहीत, तोवर मराठवाड्यातील तीन तरुणांनी मराठा आरक्षणासाठी मृत्यूला कवटाळलं आहे.
छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यातील तरुणाने जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपल्यावर अंत्यसंस्कार करू नका असे लिहून जीवन संपवलं आहे.
जालन्यातील सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील बांद्रा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोणीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. सरकारने मागून घेतलेल्या मुदतीत आरक्षण न दिल्यामुळे जरांगे यांनी २५ ऑक्टोबरपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करत मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचबरोबर मराठा तरुणांकडून टोकाचं पाऊल उचललं जात आहे.
मराठवाड्यात तीन तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. हिंगोली जिल्हयातील आखाडा बाळापूर तालुक्यातील २५ वर्षीय तरुण नाव कृष्णा उर्फ लहू कल्याणकर याने आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. कृष्णा शेतमजूरी करत होता. तसेच तो ट्रॅक्टर चालक म्हणूनही काम करत होता.
दुसरी घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथे घडली आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून शिवाजी माने (४५) याने आत्महत्या केली. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन माने यांनी जीवन संपवलं.
दरम्यान, तिसरी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली.गणेश काकासाहेब कुबेर (२८) या तरुणाने आज दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन मृत्यूला कवटळाले. गणेश कुबेर जरांगे यांच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एका बोर्डवर लिहिले होते की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नका. मराठवाड्यात दिवसभरात तीन आत्महत्या झाल्यानं आरक्षणाचा मुद्दा भडकण्याची शक्यता आहे.