शासनाने विज्ञान शिक्षक होण्यासाठी विद्यापीठ अथवा मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त असणे बंधनकारक केले आहे. मात्र, पदोन्नती २०२२ मध्ये झाली असेल, तर दीड वर्षांत ‘बी. एस्सी.’ची पदवी कशी पूर्ण करायची, असा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील विज्ञान विषय शिक्षकांनी उपस्थित केला आहे. शासनाने पदवी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विज्ञान शिक्षकांनी पदवी प्राप्त केल्याशिवाय त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येऊ नये. सहावी ते आठवीच्या वर्गासाठी नवीन आदेशानुसार विज्ञान शिक्षक पदावर पदोन्नती देताना त्यांच्याकडे पदवी असायला हवी. पदवी नसल्यास अशा शिक्षकांची पदस्थापना मूळ पदांवर करण्यात यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १९ मे २०२२ रोजी सुमारे ३५० विज्ञान विषय शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यादिवशी त्यांना आदेश दिले. हे आदेश देताना बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणे गरजेचे होते. ज्यांची बी. एस्सीची पदवी पूर्ण नाही अशा शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारलेल्या तारखेपासून पाच वर्षांत पदवी पूर्ण करावी, असे त्यावेळेच्या आदेशात स्पष्ट केले आहे. सद्यस्थिती पाहता कोल्हापुरात पदोन्नती स्वीकारलेल्या सुमारे १०० शिक्षकांची पदवी २३ जून २०२३ पूर्वी पूर्ण झाली आहे. उर्वरित शिक्षक हे पदवीच्या प्रथम, व्दितीय, तृतीय वर्षातील शिक्षण घेत आहेत. त्यांच्यावर अन्याय होणार असून ते लक्षात घेऊन शासनाने पदवी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या शिक्षकांतून होत आहे.शिक्षण विभागाकडून माहिती संकलन२३ जून २०२३ मध्ये पदवी प्राप्त केली नसलेल्या शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार विभागाने माहिती संकलन सुरू केले. त्यात संबंधित शिक्षकांचे नाव, पदनाम, सध्याची शाळा, शैक्षणिक अर्हता, पदवीधर अथवा विषय शिक्षक मूळ आदेशाची तारीख, सद्यस्थितीत पदवीधर आहे अथवा नाही आदींचा समावेश आहे.
शासनाने २३ जूनला विज्ञान विषय शिक्षकांच्या पदवीबाबत जे पत्र काढले आहे, ते अनाकलनीय आहे. जर पदोन्नती २०२२ मध्ये झाली असेल, तर बी. एस्सीची पदवी पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षे आवश्यक आहेत. मग, दीड वर्षात पदवी कशी पूर्ण करता येईल? शासनाने या बाबीचा विचार करून पदोन्नती स्वीकारल्यापासून ती कमाल पाच वर्षात पूर्ण करण्यासाठीच्या मुदतवाढीचे सुधारित पत्र काढावे.- सर्जेराव सुतार, विज्ञान विषय शिक्षक