Thursday, March 13, 2025
Homeअध्यात्मसुताचा दलाल बाळांनो दिवाळं काढील, वस्त्रोद्योग अडचणीत येईल ,पावसाअभावी पेरणी हंगामात बदल...

सुताचा दलाल बाळांनो दिवाळं काढील, वस्त्रोद्योग अडचणीत येईल ,पावसाअभावी पेरणी हंगामात बदल होईल,कोल्हापूरच्या देवीला संकटं पडलया, रात्री बाराच्या सुमारास तिच्या नेत्रातून पाणी पडतय : आप्पाचीवाडी भाकणूक

 

सुताचा दलाल बाळांनो दिवाळं काढील, वस्त्रोद्योग अडचणीत येईल ,पावसाअभावी पेरणी हंगामात बदल होईल,कोल्हापूरच्या देवीला संकटं पडलया, रात्री बाराच्या सुमारास तिच्या नेत्रातून पाणी पडतय अशा गोष्टी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिध्दनाथ देवाची यात्रेत सांगण्यात आल्या.. सविस्तर भाकणूक खालीलप्रमाणे ….

मंगळवारी पहाटेच्या निरव शांततेत हालसिध्दनाथांच्या साक्षीने वाघापुर येथील श्री भगवान डोणे यांचे सुपूत्र सिध्दार्थ डोणे महाराज यांनी जगाची भविष्यवाणी करणारी भाकणूक कथन केली. आजपर्यंतच्या भाकणूकीच्या गोषवाऱ्यातून अनेक भविष्यवाणीचा प्रत्यय आला आहे. आणि पुढील भविष्यकाळातही होणार अशी भाविकांची दृढ भावना आहे.श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील श्री हालसिध्दनाथ देवाची यात्रा शनिवार ता. २८ ऑक्टोंबरपासून सुरू झाली आहे

नाथांच्या भाकणूकीतील अनेक भविष्यवाणी सत्यात उतरत असल्याने या भाकणूकीसाठी हजारो भाविक कर्नाटक, महाराष्ट्र, , आंध्रप्रदेश भागातून येत असतात. पहाटे ४.११ वाजता भाकणूक सुरू होवून ५.५५ वाजेपर्यंत भाकणूक संपन्न झाली.
प्रारंभी यात्रेच्या रात्री ढोल वादन झाले. त्यानंतर भाविक युवकांनी गजीनृत्य सादर केले. १२.३० वाजता पालखी, घोडे, छत्री, बकरी व हालसिध्दनाथांचे मानकरी असलेला सबिना निघाला. १ वाजता मरगुबाई मंदिराजवळून वाघापुरे यांना मंदिराकडे आणण्यात आले. ३.३० वाजता पालखी सोहळा मंदिरात आला. त्यानंतर पूजा मांडण्यात आली. पहाटे ४ वाजता सिद्धार्थ डोणे यांच्या अंगात हालसिध्दनाथ संचारल्यानंतर हत्यार खेळण्याच्या कार्यक्रमात अनेकांनी बकरा बनून हत्यार मारुन घेतले. ४.११ वाजता | भाकणूकीस प्रारंभ झाला. या भाकणूकीचा गोषवारा पुढील प्रमाणे…
मेघयान मळा, माझ्या आकाशाच्या फळा, हाय की गा हाय मेघाची कावड गैरहंगामी हाय, बांधा आड बांध, शिवा आड शिव. मेघाच्या पोटी आजार हाय, द्रोणागिरी पर्वतावर देव एका पायावर उभा आहे.

लागलाय तो दुनिया न्याहाळू लागलाय, त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडला आहे. कोल्हापूरचे राजघरा क्षत्रीय वंशाच हाय. नऊ दिन नम सात दिन भोंब बरोबर हाय. वाडी कुर्लीचा आघात मोठा हाय. जगात झेंडा मिरवल. भोंबच्या पुनवला माझा सोहळा निघतोय. चिंचेच्या बनात मी खेळायाला जातोय. कारीच्या माळात माझी विश्रांती हाय. खडकाच्या माळाला बाळांनो भाषण चाललया. वाडी-कुर्लीच्या खडकावर फार वर्षापूर्वी निशान रोवलया. माझी विटंबना करशीला तर मातीत मिसळून जाशीला. खडकाच्या माळावर ३३ कोटी देवांचा दरबार भरलाय. कांबळ्याच्या खोळात मी कोलांट्या मारत बसलोया, बसलोया बसलोया फुलांच्या माळात पृथ्वीची घडामोड करत बसलोया. आप्पाचीवाडी तीर्थ क्षेत्र प्रतिशिर्डी होईल. तिरूपती बालाजीचा अवतार हाय. आप्पाचीवाडी बाळांनो सोन्याची काडी हाय. वाडी-कुर्लीच्या माळात इथ नाथांचा दरबार भरलाया. हालसिध्दनाथांची पुण्यभूमी पवित्र राहिल. हालसिध्दनाथांचा त्रिभुवनात जयजयकार चाललाय. पिवळ्या भस्माचा महिमा वाढतच राहिल. वाडी-कुर्लीच्या पुजारी मानकऱ्यांना माझा आशिर्वाद आहे. वाडी- कुर्लीच्या सबिन्यात फुट पाडशिला तर यमपुरीला जाशीला. ही धर्माची गादी हाय.. त्याला रामराम करा. पिंजऱ्यातला राघू भाषण करील. महाराष्ट्र राज्यात नदीजोड प्रकल्प येईल दुष्काळी भाग पाण्याखाली येईल.ta

देशात समान नागरीक कायदा लागू होईल. जंगलांना वणव्याचा धोका होईल. जंगलात असलेली औषधी वनस्पती नष्ट होईल. महाराष्ट्र राज्यात नदीजोड प्रकल्प येईल, दुष्काळी भाग पाण्याखाली येईल, पाण्यामुळे नंदनवन होईल. धर्माची गादी हाय. धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा पिंजऱ्यातला राघु भाषण करील. खरीप बोरीप बहूत उदंड पिकेल. जमिनीतील धान्य बहुत बेमान हाय. तांबडी रास मध्यम पिकल. काळी रास सुफळ जाईल. मूग, सोयाबीन, तूर, कडधान्य उदंड पिकल, सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल. डाळीचा भाव तेजीत राहिल. दिड महिन्याचे येथून पुढे धान्य निघल. पांढरी रास उदंड पिकेल. गोरगरीबांचा पुरावा करील. पांढर धान्य उदंड पिकलं. तांबडी कळी मध्यम पिकलं, ताजव्यातून जोकेल. कागदातून विकेल, धान्य दारात वैरण कोण्यात होईल. वैरण सोन्याची होईल. सांभाळून राव्हा, ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. गव्हाची पेंडी मध्यम पिकेल. बांधा आड बांध शिवा आड शिव. धान्य, वैरण – काडीची येथून पुढे चोरी मारी होईल, पडतील पडतील दिवसा डाके-दरोडे पडतील, लुटालूट होईल, महाराष्ट्र राज्यात एन्रॉनची लाईट येईल, लाईटने जनजीवन विस्कळीत होईल. भागूबाई सात बहिणींना घेऊन हालसिद्धनाथाच्या भेटीला येईलं. सुखा दुःखाच्या गोष्टी करतील. काव-कटाळा काढतील. निपाणकर सरकार हालसिध्दनाथाच्या शापातून मुक्त होतील. कोल्हापूरची अंबाबाई त्यांच्या पाठिशी राहिल. सीमाप्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहिल. निपाणी भागात मोठा गोंधळ माजेल, येतील येतील अतिरेकी येतील, फायरिंग, जाळपोळ करतील, होतील होतील बॉम्बस्फोट होतील. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भगदाड पडेल. कर्नाटक राज्यातील चौथाई कोना ओस पडेल. जलमय होईल. ऊसाच्या कांड्याने दुधाच्या भांड्याने गावोगावी, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्याराज्यात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल, शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाडकष्ट करील. गुरेढोरे घेईल. निगा करेल. दूधदुभते करील. डेअरीला घालील. डेअरीचा मॅनेजर मलई खाईल.

दूध घालणारा शेवटी कर्जात राहिल. गायी-म्हशींचा भाव गगनाला भिडेल. दुधाचा भाव वाढत जाईल.
दिवसेंदिवस वाढत राहील. नदी काठची जमीन ओसाड पडेल. सोन नेसशीला, जरी काठी नेसशीला, सतरा गाठीचा सदरा मिळेल. बारा वर्षाची मुलगी आई होईल. कानानं ऐकशील डोळ्यानं बघणार नाहीसा, लागलाय लागलायं नियतीनियतीचा खेळ बिघडाय लागलाय, उगवत्या सुर्याला संकट पडले आहे. शर्यती बसव्या तुम्हाला शाप देईल, जाती धर्म बिघडत चालला आहे. जाती धर्मात वैरत्व वाढेल. हाणामाऱ्या होतील. धरणी माता दुभंगून जाईल. धरणी मातेतून भोंगे बाहेर पडतील. मानव जातीला हानी पोहचेलं, मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही. छातीची ढाल करेल, माघं होणार नाही. पाकिस्तान राष्ट्राशी लढत राहील.

पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोना भारताच्या ताब्यात येईल. भारत मातेचा जगात जयजयकार होईल. पारव फूल सुफळ जाईल, पिवळ फूल उदंड पिकल मोलानं विकल, पांढर फूल मध्यम पिकल. तांबड फुल उदंड पिकल, देवाधर्माचा पुरावा करल. लुगडी-घोंगडी, कपडेलत्ता मनुष्याला फुकाचे होईल. सरकी फुकाची, मेंढी मोलाची होईल. जग दुनियेत मोठे नवल होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. जगात किर्ती होईल. म्होरल भविष्य मेंढीच्या मेंढक्याला माझा आशिर्वाद हाय. मेंढीमाऊली मेंढक्याला सुखाची सावली होईल, मेंढीपासून वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढीचा भाव १ लाखाच्या घरात जाईल, खेळत राहिल. मेंढीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घालतील. पालखीतून मिरविल. मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहिल. साखरेचा भाव तेजीमंदीत राहिल. गुळाचा भाव वाढत राहिल. मांडवाच्यादारी ३६०० म्हणता ३५०० वर येईल. ३५०० म्हणता ३४०० वर येईल, चढल- उतरल, तंबाखूची पेंडी मध्यम पिकेल.

तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. तंबाखूमुळे मनुष्याला रोगराई होईल. तंबाखूचा बंबाखू होईल. तरूण पिढी बर्बाद होईल. ऊसासाठी राज्या-राज्यात, देशात मोठी कर्माचे पीक हाय, पावसाअभावी पेरणी हंगामात बदल होईल, कोल्हापूरच्या देवीला
संकटं पडलया. रात्री बाराच्या सुमारास तिच्या नेत्रातून पाणी पडतय. परमेश्वर त्याचा
न्याय निवाडा करेल. चाललय चाललय जगाच भविष्य चाललय. सांभाळून रहा. काळ्या खडकाच्या लाह्या उटतील,
खडकाच्या माळाला धडका खाशिला. कोल्हापूरच्या गादीवर इंगाळ पेटतील. साताराच्या गादीवर फुल पडतील. वीजबाईने मोठा कल्लाटा निर्माण होईल. मोठे नुकसान होईल. डोंगर पर्वत वाफेने जातील. डोंगराचा भोंगर होईल. शिवाजी महाराजांचा तुम्ही जयजयकार करा शिवाजी महराज कुणाच्या तरी पोटाला जन्माला येतील. भगवा झेंडा राज्य करील, सभेत मिरवल. थराचा धोंडा थराला बसेल. तिरंगी झेंडा भंगाला जाईल. वस्त्रोद्योग मोठ्या अडचणीत येईल. सुताचा दलाल बाळांनो दिवाळं काढील. नवखंड पृथ्वी, दहावी खंड करवीर काशी बरोबर हाय, करवीर काशीला माझ ठिकाण हाय, वाडी कुरलीच्या बाळांनो तुम्ही एकीने वागावे.

आलोया आलोया तुम्हाला सांगत आलोया. खाशीला खाशीला बाळांनो थोबाडी खाशीला. वागू नये वागू नये गर्वाने वागू नये, गर्वाने वागशीला तर थोबाडी खाशीला, फसून जाशीला, गर्वाचे घर खाली हाय. मी गा थोरला तु गा थोरला. लहानाचा मोठा आणि मोठ्याचा लहान होईल. हाय की गा हाय बाळानो मुंबई हायकोर्ट हाय निवाडा करण्याला. हाय की गा हाय विखाचा पेला हाय. खैराचा इंगोळ हाय. बो-हाटीचा काटा हाय. तुमचं दुःख पायाशी घेईन, माझ्या झोळीची रिध्दी- सिध्दी देईन. करीन- करीन पांढरीची राखण करीन. छाया धरीन पोटाशी धरीन. जतन करीन. कांबळ्याचा शेवट घालीन. गावातील ईडापिडा दूर करीन. गावात रिध्दी – सिध्दी नांदवीन. बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन. आज वर्षाचा दिवस बाळगोपाळास्नी सुखी ठेवीन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -