अवघ्या आठवडाभरावर आलेल्या दिपावलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मॉलमधील खरेदीकडेही नागरिकांचा ओढा वाढला आहे.
गणेशोत्सव, दसऱ्यानंतर नागरिकांना उत्सुकता लागते ती दिपावलीच्या खरेदीची. खरेदीसाठी अबालवृध्द शहरातील मॉल्स आणि दुकानामध्ये गर्दी करीत आहेत. वसुबारस, नरक चतुर्दशी ते भाऊबीज अशा दिपावली पर्वा सर्वच सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यास शहरवासिय व
ग्रामीण भागातील नागरिक सज्ज झाले आहेत. थंडीची सुरुवात झाली असून कोल्हापुरात भाविक आणि पर्यटकांचीही पर्यटनवारीसाठी मोठी गर्दी झाली आहे. दसरा नुकताच पार पडला असल्याने आता दिपावली सणाच्या खरेदीसाठी मॉल तसेच दुकानामध्ये सकाळपासूनच गर्दी होऊ लागली आहे.
पाहिल्या टप्प्यातच दिपावलीची खरेदी यामध्ये
कपडे, फराळाचे साहित्य, किराणा, लाईटच्या विविध प्रकारच्या माळा, आकाशदिवे, रांगोळी, पणत्या, विविध प्रकारचे सेंट, सुगंधी अगरबत्या, सुगंधी तेल, उटणे, साबण, तसेच दीपमाळांच्या खरेदीसाठी सर्वच दुकांनामध्ये तोबा गर्दी झाली असून विविध प्रकारांनी दुकाने सजली आहेत, तसेच शहरातील इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, दुचाकी व चारचाकी वाहनांची शोरूम, सराफी दुकाने, फटाक्याची दुकाने सजली आहे. दसऱ्याबरोबरच दिपावलीमध्येही व्यापारी व उद्योजकांचा व्यवसाय चांगला होत असल्याने व्यापारी वर्गात मात्र समाधान आहे.
दिवाळी म्हटले की गोड-धोड़ पदार्थांची रेलचेल आलीच, त्यामुळे मिठाईची दुकाने सजली असून फराळाचे सर्व प्रकारचे प्रकरच पदार्थ विक्रीसाठी तयार होऊ लागले आहेत. पुढच्या आठवड्यातील गुरुवारपासून सुरु होणाऱ्या दिपावली पर्वातील वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी व लक्ष्मी-कुबेरपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बाजारपेठेत नागरिकांनी आत्तापासूनच खरेदीसाठी गर्दी केली आहे. दिपावली खरेदीसाठी कोल्हापूर शहरातील महाव्दार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, लक्ष्मीरोड, भाऊसिंगजी रोड, राजारामपुरी, गांधीनगर, शाहूपुरीसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. वाढत्या गर्दीमुळे शहरातील रस्त्यावर रस्त्यावर व चौकाचौकात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
तसेच राज्याबाहेरुन पर्यटकांचीही वर्दळ वाढली असून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेस, कणेरीमठ, नृसिंहवाडी, जोतिबा, पन्हाळा, आंबा, गगनबावडा, राधानगरी, दाजीपूर अशा पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.