पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला आहे. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात जोश इंग्लिसच्या झंझावाती शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या ८० आणि इशान किशन धावांच्या झंझावाती खेळीमुळे शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र, एक चेंडू शिल्लक असताना रिंकू सिंगने भारताला विजय मिळवून दिला. रिंकू १४ चेंडूत २२ धावा करून नाबाद परतला.
भारताच्या युवा संघाने यावेळी ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदल घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर दोन विकेट्स राखत थरारक विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सूर्याने यावेळी ४२ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८० धावांची धमाकेदार खेळी साकारली.
भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात यशस्वी जैस्वालने केली. पण यावेळी दुहेरी धाव घेण्याच्या नादात यशस्वी आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात ताळमेळ जमला नाही. दुसरी धाव घेण्यासाठी यशस्वी धावत सुटला पण त्यानंतर तो पीचच्या मध्येच थांबला आणि त्याने आपण धाव घेणार नसल्याचे संकेत ऋतुराजला दिले. ऋतुराज तेव्हा क्रीझ सोडून अर्ध्या पीचवर आला होता आणि तिथून माघारी फिरणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे एकही चेंडू न खेळता ऋतुराज बाद झाला. त्यांनंतर यशस्वी याची भरपाई करेल, असे वाटत होते. पण तो जास्त काळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. मॅथ्यू शॉर्टला ऑफ साईटला मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. यशस्वीने यावेळी ८ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर २१ धावा केल्या. यशस्वी बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. त्यानंतर सूर्या आणि इशान किशन यांची चांगली जोडी जमली होती. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाटत होते. या दोघांनीही अर्धशतकं झळकावली. पण इशान किशन २ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५६ धावा करून बाद झाला. पण सूर्या मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून उभा होता. दरम्यान ऑस्ट्रेलियाची आक्रमक फलंदाजीने सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का पाचव्या षटकात बसला खरा. पण त्यानंतर जोश इन्गिस आणि स्टीव्ह स्मिथ यांची जोडी चांगलीच जमली.
स्मिथपेक्षा यावेळी जोश हा जास्त आक्रमक फलंदाजी करत होता. जोश आणि स्थिम यांनी यावेळी दुसन्या विकेटसाठी १३० धावांची दमदार भागीदारी रचली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभारता आला. स्मिथ यावेळी धावचीत झाला, पण त्याने आठ चौकारांच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली होती. पण इन्गिसने मात्र स्मिथ बाद झाल्यावरही धडाकेबाज फटकेबाजी सुरु ठेवली आणि ४७ चेंडूंतच आपले शतक पूर्ण केले. जोशने यावेळी धमाकेदार फटकेबाजी करताना फक्त ५० चेंडूंत ११ चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ११० धावांची दणकेबाज खेळी साकारली. प्रसिध कृष्णाने त्याला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. पण ऑस्ट्रेलियाने यावेळी २०८ धावांचा डोंगर उभारला होता.