सायबर चोराचा फटका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या आईला बसला आहे. ऑनलाइन फसवणूक करत त्याने फिर्यादी महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी माहीम पोलीस अधिक तपास करत आहेत.ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले असून बऱ्याच जणांना त्याचा फटका बसतो. अशाच एका सायबर चोराचा फटका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या आईला बसला आहे. महिला क्रिकेटपटून पूनम राऊत हिच्या आईची सायबर गुन्हेगाराने फसवणूक केली असून त्यांच्याकडे लाखो रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने पाच मोबाईल क्रमांकांचा वापर करत राऊत यांना हा गंडा घातला. याप्रकरणी माहीम पोलीस अधिक तपास करत आहेत.राऊत यांच्या पतीकडून घेतलेली कर्जाची रक्कम परत करण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादी महिलेकडून एक लाख रुपये लुटले. फिर्यादी महिला , राऊत ( वय 54) या माहीम पश्चिम येथील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर माहीम पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गुन्हेगाराचा कसून शोध घेत आहेत. तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या मार्फत त्या सायबर चोरट्याचा तपास सुरू आहेफिर्यादी राऊत यांना 9 डिसेंबर रोजी अमित कुमार नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तुमच्या पतीने मला 15 हजार रुपये कर्ज म्हणून दिले होते, असं सांगत ही रक्कम तुमच्या मोबाईलवर गुगल पे द्वारे पाठवण्यास त्यांनी सांगितल्याचं आरोपीने नमूद केलं. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने राऊत यांच्या बँक खात्यामध्ये आधी 10 हजार आणि नंतर 50 हजार पाठवले, तसे दोन मेसेजही राऊत यांना आले. मात्र थोड्या वेळाने अमित कुमार यांनी पुन्हा राऊत यांना फोन केला आणि तुमच्या खात्यात चुकून 50 रुपये जमा झाले, असे सांगितले. ते पैसे प्लीज पुन्हा माझ्या अकाऊंटमध्ये पाठवा, असेही तो म्हणाला.
- त्यानंतर अमित कुमार याने राऊत यांना बोलण्यात गुंतवून विविध मोबाईल क्रमांकांवर सुमारे एक लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. मात्र काही काळाने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आल आणि त्यांनी तत्काळ माहीम पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. फसवणुकीसाठी आरोपीने पाच मोबाईल क्रमांकाचा वापर केला आहे. त्या संदर्भातील अधिक माहिती घेऊन पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत