2019 मध्ये MPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये SEBC प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नियुत्या मिळालेल्या नव्हत्या. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तब्बल 3486 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होऊन देखील शासन सेवेत नियुक्ती मिळणार नव्हती. या विद्यार्थ्यांनी आपणास नियुक्ती मिळावी अशी कैफियत स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांच्याकडे मांडली होती.
डॉ.धनंजय जाधव यांनी या विद्यार्थ्यांना घेवून हा विषय छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे मांडला होता. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी तातडीने याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव तसेच राज्याचे महाधिवक्ता असे अनेक मान्यवरांची भेट घेवून या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाने कायदेशीर लढाई लढावी अशी आग्रही मागणी केली होती.
छत्रपती संभाजीराजे यांच्या मागणीला अनुसरून महाराष्ट्र शासनाने देखील तातडीने या विषयाची दखल घेवून उच्च न्यायालयात मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी कायदेशीर लढाई लढली. आज याबाबत उच्च न्यायालयाने मराठा विद्यार्थ्यांचा बाजूने निकाल दिला असल्यामुळे तब्बल 3485 विद्यार्थ्यांना या निकालाचा आधार घेवून शासन सेवेत नियुक्ती मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या विद्यार्थ्यांनी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे तसेच स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव यांचे आभार मानले तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कायदेशीर लढाई लढणाऱ्या वकिलांचे देखील आभार मानले.
3485 विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता होता. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांच्यामुळे या मुलांचे नुकसान टळले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी 3485 विद्यार्थ्यांचा प्रश्न लगेचच शासना पुढे मांडला. आज याबद्दलचा निर्णय उच्च न्यायालयाकडून देण्यात आला. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळत आहे.