कोरोनाचा नवा व्हेरियंट पसरत चालला असल्याने धोका वाढत चालला असल्याचं दिसत आहे. अशातच राज्यातील महायुती सरकारमधील कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना कोरानाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतल्यावर ते पॉझिटिव्ह आल्याचं समजलं. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट (एक्स) करत माहिती दिली आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे? नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली. त्यानंतर पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलं आहे. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. धनंजय मुंडे पुण्यामधील मॉडर्न कॉलनीमधील घरात क्वारनटाईन झाले असल्याची माहिती समजत आहे.