मराठा आरक्षण आंदोलनाचा विजय झाल्यानंतर नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भव्य सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं ऐतिहासिक भाषण झालं. या विजयी मेळाव्यातील त्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतर मनोज जरांगेनी सर्व मराठा बांधवांचे अभिनंदन करत गावाकडे परत जाण्याचा इशारा केला.
मागण्या पूर्ण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात, गावा-खेड्यात रस्त्यावर येऊन, नाचून, गुलाल उधळत मराठा बांधव आनंद साजरा करत आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस हा जणू दिवाळीच..सभेनंतर मनोज जरांगेही स्टेखाली उतरून परतीच्या दिशेने निघाले.
मात्र समोर हजारोंचा समुदाय हा आपल्या या नेत्याची वाटत पहात उभा होता. मनोज जरांगे गाडीतून येताच त्यांच्यावर गुलालाची उधळण करण्यात आली. प्रचंड गर्दीतून संथपणे वाट काढत त्यांची गाडी इंचा-इंचाने पुढे सरकत होती. मात्र मराठा बांधवांच्या प्रेमाचा, अभिवादनाचा स्वीकार करत मनोज जरांगे हसतमुखाने पुढे जात होते. हाती भदवा झेंडा घेऊन त्यांनीही तो फडकावत आनंद साजरा केला. त्यांचं हे रूप पाहून मराठा बांधव नक्कीच भारावले असणार.
राज्यभरात मराठा बांधवांचा जल्लोष, गुलालाची उधळण करत डीजेवर धरला ठेकामराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. राज्यातील गावा-गावात आज सणाचे वातावरण आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर दगडूशेठ गणपतीची आरती करून पुण्यातील सकल मराठा समाज आनंदोत्सव साजरा करणार आहे. तर लोणावळ्यातही गुलालाची उधळण होत आहे. आनंद साजरा करत मराठा बांधवांनी डिजेवर ठेका धरला आहे.
मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल होण्यापूर्वी त्यांचा लोणावळ्यात मुक्काम होता. तिथे ज्या ठिकाणी त्यांची विराट सभा झाली, तिथेही मराठा बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केलाय. गुलालाची उधळण करत, डीजेच्या तालावर इथं जरांगे समर्थकांनी ठेका धरला. सर्व गाणी ही मात्र जरांगेंवर आधारितचं वाजत आहेत.सोलापूरमध्ये आनंदोत्सव, हालग्या वाजवत, नाचत आनंद साजरा
तर सोलापूरच्या माढ्यातही मराठा समाजाचा आनंदोत्सव सुरू आहे.माढ्यातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात नाचुन हालग्या वाजवत पेढे वाटुन,फटाके फोडत मोठा जल्लोष साजरा केला. तसेच सोलापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुलाबाची पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
मनोज जरांग्यांच्या गावातही जल्लोष
जालना तालुक्यातील गणेश नगर येथील मनोज जरांगे पाटील यांच्या घरासमोर नागरिकांनी मोठा जल्लोष केला आहे. गुलाल उधळत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी घोषणाबाजी करत आभार व्यक्त करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांनी खूप संघर्ष केल्याचं यावेळी नागरिकांनी म्हटले .
तसेच पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर मध्ये देखील मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडत एकमेकांना पेठे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला, यावेळी मराठा समाज बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
सकल मराठा समाजाचा कोल्हापुरात आनंदोत्सव
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा बांधव दसरा चौकात जमले आहेत. तेथे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव सुरू आहे. अनेक गावांत सणासुदीचे वातावरण आहे.