पुढच्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीगचा नवीन सीजन सुरु होईल. आयपीएलच पूर्ण शेड्यूल अजूनपर्यंत आलेलं नाहीय. बीसीसीआयने फक्त 21 मॅचच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. याच कारण आहे, या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका. आता बातमी अशी आहे की, बीसीसीआय आयपीएलचा दुसरा हाफ भारताबाहेर यूएईमध्ये आयोजित करेल.
TOI ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. बीसीसीआयचे काही वरिष्ठ अधिकारी सध्या UAE मध्ये आहेत. आयपीएलचे उर्वरित सामने भारताबाहेर आयोजित करण्याचा विचार सुरु आहे.
निवडणूक आयोग शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. त्यानंतर आयपीएलच्या उर्वरित शेड्यूलमधील सामन्याबाबत घोषणा होईल. निवडणुकीमुळे बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळेच बीसीसीआय आयपीएलच देशाबाहेर आयोजन करण्याचा विचार करत आहे.
देशाबाहेर आणि पुन्हा भारतात म्हणजे कसं?
बीसीसीआयने 22 मार्च ते 7 एप्रिल पर्यंतच्या मॅचच शेड्यूल जाहीर केलय. अन्य सामन्यांची अजून प्रतिक्षा आहे. दुसरा हाफ बाहेर आयोजित होऊ शकतो. कदाचित पुन्हा आयपीएलचा शेवटचा फेज भारतात होऊ शकतो. म्हणजे प्लेऑफ आणि फायनल.
याआधी कधी देशाबाहेर आयपीएलच आयोजन झालय?
दरवेळी लोकसभा निवडणुकीच्या काळात आयपीएलच्या आयोजनात अडथळे येतात. 2009 मध्ये आयपीएलचा संपूर्ण दुसरा सीजन दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर 2014 लोकसभा निवडणुकीच्या काळात आयपीएलच्या पहिल्या हाफच आयोजन भारतात तर दुसरा हाफ यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता.
2019 मध्ये लोकसभा निवडणुका असूनही संपूर्ण सीजन भारतातच आयोजित झाला होता. कोविडच्या काळातही बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये केले होते.