‘बिग बॉस 17’चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचं आणि वादाच जुनं नातं आहे. सध्याही तो नव्या वादात सापडला. हुक्का बारमध्ये मारलेल्या छाप्यादरम्यान पोलिसांनी मुनव्वर फारुकीला ताब्यात घेतलं. त्याच्या इतर 13 लोकांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. फोर्ट परिसरातल्या एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लरमध्ये हे आरोपी सापडले होते. पोलिसांनी त्या हुक्का बारवर छापा टाकून कारवाई केली होती. तेथून मुनव्वरसह १४ जणांना ताब्यात घेण्यात आलं.
मात्र जामीनपत्र गुन्हा असल्याने पोलिसांनी आरोपीना नोटीस देऊन सोडलं. या कारवाईत 4400 रुपये कॅश आणि 9 हुक्का पॉट जप्त करण्यात आलेत. तसेच एकूण 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर खुद्द मुनव्वर फारूकीने , तो एअरपोर्टवर जात असल्याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. थकलोय पण प्रवास करतोय… असं त्याने त्यामध्ये लिहीलं आहे. पोलिसांच्या या छाप्याशी मुनव्वरचा काहीही संबंध नाहीये, असं एकीकडे त्याच्या टीमकडून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पण दुसरीकडे या छाप्याशी निगडीत पोलिस अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेली माहिती काही वेगळीच आहे. ‘ हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकाने मुंबईतील हुक्का बारवर छापे टाकले. तिथे सापडलेल्या गोष्टींची चौकशी केली जात आहे. आणि तेथून ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये मुनव्वर फारूकीचाही समावेश होता, ‘ असे त्या अधिकाऱ्याने नमूद केले.
फक्त चौकशी झाली
खरंतर, मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून हुक्का बारमधून १४ जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. तेथे प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी मुनव्वर फारुकीला सोडून दिले. मात्र, या प्रकरणी मुनव्वर यांनी कोणतेही अधिकृत स्टेटमेंट दिलेले नाही.