लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. देशभरासह महाराष्ट्रातही पाच जागांवर शुक्रवारी मतदान झाले. मात्र असे असले तरी राज्यात महायुतीमधील अनेक जागांवर अद्याप वाद आहे. काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथील लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला… या जागेवर तिढा निर्माण झाल्यामुळे माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यामुळे नाशिकची जागा आता कोणाला मिळणार हा प्रश्न अजूनही सुटलेला नसून त्याचा सस्पेन्स कायम आहे.
हेमंत गोडसे की अजय बोरस्ते, कोणाचा नंबर लागणार ?
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश असल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय शुक्रवारी पत्रकार परिषद जाहीर केला. या जागेवर तिढा निर्माण झाल्यामुळे माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता एकीकडे ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळेल असे जवळपास निश्चित झाले आहे. पण, शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना की अजय बोरस्ते हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मात्र दुसरीकडे भाजपने या जागेवर आपला दावा कायम ठेवल्याने गोडसे यांच्यापुढे उमेदवारीचा पेच कायम कायम आहे…आज याबाबत निर्णय घोषित होईल असे समजते.
माघार घेताना काय म्हणाले छगन भुजबळ ?
नाशिकच्या जागेसोबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. अमित शाह यांनी नाशिकची जागा लढवण्याचे मला सांगितले. त्यावेळी ही जागा शिवसेनेकडे असल्याचे आम्ही सांगितले. त्यानंतर अमित शाह म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलू. त्यानंतर मी काम सुरु केले, असे छगन भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये येऊन विविध घटकांशी चर्चा सुरु केली. मराठा समाज, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक विविध घटकांनी मला पाठिंबा दिला. परंतु यानंतर तीन आठवडे झाले आहेत. आता महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन त्यांच्याकडून प्रचाराचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेतून नाशिकचा प्रश्न सुटला नाही. यामुळे मी माघार घेत आहे.