सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 67 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीला या विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दिल्लीचा डाव 19.1 ओव्हरमध्ये 199 धावांवर आटोपला. दिल्लीकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क याने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. तर हैदराबादकडून टी नटराजन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हैदराबादचा हा पाचवा विजय ठरला. तर दिल्लीला पाचव्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
दिल्ली कॅपिट्ल्सकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क याने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या खेळीमुळे दिल्लीच्या विजयाचा आशा वाढल्या होत्या. मात्र विजयासाठी आवश्यक त्या रन रेटने इतर फलंदाजांना खेळता आलं नाही. जेक फ्रेझर-मॅकगर्क याव्यतिरिक्त दिल्लीसाठी कॅप्टन ऋषभ पंत याने 35 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह 44 धावा केल्या. अभिषेक पोरेल याने 22 चेंडूत 42 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाज निष्प्रभ ठरले. हैदराबादकडून नटराजनशिवाय नितीश रेड्डी आणि मयंक मार्कंडे या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
त्याआधी ट्रेव्हिस हेड याच्या 89 आणि अभिषेक शर्मा याने 46 धावांची खेळी केली. हेड आणि शर्मा या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 131 धावांची विक्रमी भागीदारी केली. मात्र हे दोघे आऊट झाल्यांतर मिडल ऑर्डरला त्यांच्याच वेगाने धावा करता आल्या नाहीत. दिल्लीने हैदराबादला झटपट काही धक्के दिले. त्यामुळे हैदराबादच्या धावांचा वेग मंदावला. नितीश रेड्डी 37, हेन्रिक क्लासेन 15 आणि एडन मारक्रम 1 धाव करुन आऊट झाले. मात्र त्यानंतर शाहबाज अहमद याने अखेरीस मोठे फटके मारुन हैदराबादला 250 पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. शाहबादने 59 धावा केल्या. तर अब्दुल समदने 13 धावा जोडल्या. कॅप्टन पॅट कमिन्स 1 वन रन आऊट झाला. दिल्लीकडून कुलदीप यादव याने 4 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेलच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दिल्ली प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.
सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन