कंपनीने पाठवलेल्या चॉकलेटची निर्मिती ही मार्च महिन्यातील असून जानेवारी आणि फेब्रुवारीचा पोषण आहार म्हणून त्या कशा पाठवण्यात आल्या याबद्दल प्रश्न निर्माण होतो आहे.
राज्यात शाळांना सुट्या लागल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांना जानेवारी, फेब्रुवारीमधील शालेय पोषण आहार आता दिला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात शालेय पोषण आहारासंदर्भात धक्कादायक बातमी आली आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असणाऱ्या चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चॉकलेटचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिलेल्या मिलेट्स चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेतर्फे वितरित होणारा शालेय पोषण आहार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. या वादात आता नागपूरच्या कंपनीने भर घातली आहे.
पालकांनी परत आणले चॉकलेट
चातारी प्राथमिक मुलींची कन्या शाळेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वाटपाच्या सूचना दिल्या. त्यानुसार एकूण 95 पालकांपैकी 65 पालकांनी शालेय पोषण आहार घेतला. त्यांनी चॉकलेट घरी नेले त्यापैकी 25 पालकांनी चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या आळ्या असल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्व पालकांना धक्का बसला. पालकांनी मुख्याध्यापकांना हे चॉकलेट परत आणून दिले.
जानेवारीमधील पोषण आहार
जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 30 ग्रॅम प्रति याप्रमाणे रागी, जवार व बाजरा या तीन प्रकारचे चॉकलेट विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या मध्यामध्ये शाळेत ठेकेदारांनी पोहोचवले. यावेळी शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या. विशेष म्हणजे हा शालेय पोषण आहार जानेवारी आणि फेब्रुवारीचा आहे. कंपनीने पाठवलेल्या चॉकलेटची निर्मिती ही मार्च महिन्यातील असून जानेवारी आणि फेब्रुवारीचा पोषण आहार म्हणून त्या कशा पाठवण्यात आल्या याबद्दल प्रश्न निर्माण होतो आहे
चॉकलेटला चव नाही
कंपनीने पाठवलेल्या या तीनही चॉकलेटला कुठल्याही प्रकारची चव नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चॉकलेट व्यवस्थित राहावे त्यासाठी कुठलीही शितपेटीची व्यवस्था नाही. चॉकलेटची गुणवत्ता अतिशय खालच्या दर्जाची आहे. त्याच्यावर किंमत देखील नाही. तालुक्यातील बऱ्याच गावातून चॉकलेट खाल्ल्यानंतर त्रास होत असल्याच्या तक्रारी केंद्रप्रमुखांकडे प्राप्त झाल्या होत्या. परंतु चॉकलेट लवकरात लवकर वाटून संपवा असा आदेश वरिष्ठांकडून आल्यामुळे मुख्याध्यापक मोठ्या अडचणीमध्ये सापडले आहेत.