“महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “आम्ही सन्मानजनक जागा लढणार”, असंदेखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी अजित पवार यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. जागा वाटपात महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या या वक्तव्यावर महायुतीमधील महत्त्वाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. आम्ही एक समन्वय समिती नेमत आहोत. राज्यात एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा दोन दिवसात चर्चा होईल. चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भात तपशील देऊ. माझ्या माहितीनुसार, जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही मतभेत नाही. आम्ही निवडून येण्याची क्षमता बघून या सर्व गोष्टींचा निर्णय घेणार”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
“स्वबळावर निर्णय घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहू शकते. महायुतीत अधिक जास्त प्रमाण आहे. महाविकास आघाडीत आहेच, पण महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त आहे. प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. क्रांतिकारी योजनांसमुळे आपल्याला विधानसभेत जाण्याची संधी मिळण्याची कार्यकर्त्यांनी भावना धरली तर त्यात वावगं नाही”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
‘अजून जागा वाटपाबाबत कुठेही काही ठरलेलं नाही’, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
भाजप नेते गिरीश महाजन यांनी जागा वाटपाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “अजून जागा वाटपाबाबत कुठेही काही ठरलेलं नाही. आम्ही तीन पक्ष आहोत. आम्ही सध्या चाचपणी करतो आहोत. एवढी गोष्ट नक्की आहे की, आम्ही तीनही पक्ष एकत्रितपणे लढणार आहोत. महायुती म्हणूनच आम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहोत. जागा वाटपाचा विषय हा दिल्लीत फायनल होईल. आमचे पक्षश्रेष्ठी याबाबत शेवटचा निर्णय घेतील”, असं गिरीश महाजन म्हणाले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “आमची विधानसभेच्या सर्व 288 जागा लढण्याची तयारी आहे. पण महायुतीत लढण्याची तयारी आहे. आमच्या सहयोगी पक्षांना जागा दिल्यानंतर आम्ही उरलेल्या जागा लढणार”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
संजय शिरसाट काय म्हणाले?
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली. “युतीमध्ये कोण किती जागा लढवेल याचा निर्णय या पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत ठरेल. तीनही पक्षाचे पक्षाचे प्रमुख नेते एकत्रपणे बसून याबाबतचा निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील तो अंतिमत: सर्वांना मान्य राहील. आमच्यात कुठेही कुरबुर होणार नाही याची काळजी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.