काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. संसदेमध्ये आपण केलेले भाषण दोघांमधील एकाला आवडले नाही. चक्रव्यूहचा संदर्भ घेऊन केलेल्या या भाषणामुळे आपल्यावर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कारवाईची शक्यता आहे. ईडीमधील काही सूत्रांनी आपल्यावर कारवाई होणार असल्याची माहिती दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे. राहुल गांधी यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांनी काय म्हटले?
एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी म्हटले की, दोघांपैकी एकाला माझे चक्रव्यूहचे भाषण आवडले नाही. ईडीमधील आतील गटाने मला सांगितले की, तुमच्यावर छापेमारी केली जाणार आहे. त्यासंदर्भात योजना तयार केली जात आहे. मी तयार आहे. ईडीची वाट पाहत आहे. चहा आणि बिस्कीटे माझ्याकडून”
काय आहे विषय
29 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वर बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले होते की, देशातील शेतकरी, मजूर आणि तरुण घाबरले आहेत. महाभारत युद्धाच्या चक्रव्यूहचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला. महाभारतातील युद्धात सहा जणांनी अभिमन्यूला मारले. आता नवे चक्रव्यूह तयार केले जात आहे. तेही चक्रव्यूह कमळाच्या आकाराचे होते. त्या कमळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी छातीवर घेऊन फिरतात. अभिमन्यूला द्रोण, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वस्थामा आणि शकुनी अशी 6 जणांनी मारली. आजही चक्रव्यूहाच्या मध्येही 6 लोक आहेत. त्यावेळी सहा लोक होते. तसेच आजही आहे. त्यात मोदी, शाह, संघ प्रमुख मोहन भागवत, डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत. हे सर्व काही कंट्रोल करत आहेत.
राहुल गांधींच्या या विधानावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना आडकाठी आणली आणि त्यांना आठवण करून दिली की, या सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीचे नाव घेऊ नये. यावर राहुल गांधी म्हणाले की अजित डोवाल, अदानी आणि अंबानी यांची नावे घ्यायची नसतील तर घेणार नाही.