हिंदू धर्मात अमावस्येला खूप महत्त्व आहे. अमावस्या तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व अनेक पटींनी जास्त मानले जाते.
कारण ही चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथी असते आणि यानंतर श्रावण महिना सुरू होणार असतो. दीप अमावस्या ४ ऑगस्टला आहे.
अमावस्या तिथी महिन्यातून एकदा येते. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी नैवेद्यही केला जातो. अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे.नदीत स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन पितरांना नैवेद्य दाखवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी उपवास करतात. चला जाणून घेऊया आषाढ अमावस्या पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त.
अमावस्या कधी आहे?
अमावस्या तिथी प्रारंभ – ३ ऑगस्ट २०२४ दुपारी ३ वाजून ५० मिनिटे
अमावस्या तिथी समाप्त – ४ ऑगस्ट २०२४ दुपारी ४ वाजून ४२ मिनिटे.
उदयातिथीनुसार अमावस्या रविवार ४ ऑगस्ट या दिवशी साजरी केली जाईल.
अमावस्येचे महत्व
आषाढ अमावस्येलाच, दीप आमावस्या आणि गतहारी आमावस्या म्हणतात. या दिवशी दीप पूजनाला देखील विशेष महत्त्व असते. पुढचा येणारा काळ हा व्रत वैकल्ये, सणउत्सव यांचा असल्याने घरातील दिवे स्वच्छ करून ठेवणे गरजेचे असते. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्य येत असल्याने दिवे लावून सर्व देवांची पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येच्या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो.
गटारी अमावस्या नाव कसे पडले
श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान व्यर्ज्य असल्याने त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येला मांसाहार आणि मद्य प्रेमी ताव मारतात. खरं तर धार्मिक दृष्टीकोणातून अशी कोणतीही प्रथा नाही. तसेच या अमावस्येला गटारी हे नाव मुळ शब्दाच्या अपभ्रंशामुळे पडले आहे. गटारी नाही, गतहारी अमावस्या श्रावणाआधी येणाऱ्या आमावस्येला ‘गतहारी’ अमावस्या असेच नाव आहे. गतहार हा शब्दच मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ इथे गेलेला किंवा त्यागलेला असा घेऊन त्यागलेला आहार. कालांतराने गतहारीचा अपभ्रंश होत सध्या या आमावस्येचे नाव गटारी अमावस्या असे झाले आहे.
अमावस्या पूजा विधी
सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. या दिवशी पवित्र नदी किंवा तलावात स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून तुम्ही घरीही स्नान करू शकता.
स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा.
सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.
व्रत ठेवता येत असेल तर या दिवशीही उपवास ठेवा.
पितरांशी संबंधित कार्य या दिवशी करावे.
पितरांसाठी नैवेद्य आणि दान करावे.
या पवित्र दिवशी शक्य तितके देवाचे ध्यान करा.
या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.