गणेशोत्सव असो किंवा शिमगा… राज्याच्या बहुतांश भागांना एकमेकांशी जोडण्याची(traveling) जबाबदारी अतिशय सुरेख पद्धतीनं पार पाडत सामान्यांना परवडेल अशा दरात प्रवासाची सुविधा पुरवणाऱ्या एसटी महामंडळानं आता एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी प्रवाशांना एसटी महामंडळातर्फे देण्यात येणार आहे.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या विविध आगारातून श्रावण महिन्यादरम्यान तीर्थक्षेत्री(traveling) जाण्यासाठी ‘श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम 5 ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे.
काय आहे उपक्रमाचं स्वरुप?
एसटीच्या या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, महिलांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे. सहसा श्रावणामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. उपवास, सणवार यानिमित्तानं अनेक ठिकाणी प्रवासाचं निमित्त साधलं जातं. याच कारणास्तव एसटीनं ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम सुरू केला आहे.
उपक्रमाअंतर्गत एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय आणि एक मुक्कामी अशा स्वरुपातील धार्मिक सहलींचं आयोजन करण्यात येईल. उपलब्ध माहितीनुसार यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातील.
प्रवाशांना मिळणार कोणकोणत्या सुविधा?
नियमानुसार अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आणि 12 वर्षांखालील मुलांना अर्ध्या दरात तिकीट देण्यात येईल. राज्याच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या खेड्यांतील महिला बचत गट, विविध सेवाभावी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या पुढाकाराने या सांघिक सहलीचे आयोजन केलं जाऊ शकतं.