महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आंनदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे 19 ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे. येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. पण त्याआधीच 17 तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मैत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
एकाच क्लिकवर सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्य सरकारकडून जाहीर झालेली लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 1500 रुपये जमा होणार आहेत. कदाचित पहिल्या हप्त्यात दोन महिन्यांचे देखील पैसे महिलांना मिळू शकतात. याबाबतचा निर्णय सरकारचा अंतिम निर्णय असणार आहे. पण महिलांना आता या योजनेच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. सरकारकडून 17 ऑगस्टला पैसे वाटपासाठी कार्यक्रम पार पडेल. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित एकदाच क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाचवेळी योजनेचे पैसे जमा होतील.