Sunday, February 23, 2025
Homeक्रीडा"खेळ संपलेला नाही, खूप काही बाकी", रौप्यपदकाच्या कमाईनंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया;...

“खेळ संपलेला नाही, खूप काही बाकी”, रौप्यपदकाच्या कमाईनंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया; सुवर्णपदकासाठी पुन्हा कसली कंबर!

भारताचा स्टार भालाफेकपटू याने पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. याआधीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदकाची कामगिरी केली होती. दरम्यान, रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर नीरज चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने माझा खेळ संपलेला नाही. आणखी खूप काही बाकी आहे, असे म्हणत आगामी काळात त्याच्याकडून आणखी चांगली कामगिरी होईल, असे सूचित केले आहे.

 

नीरज चोप्रा काय म्हणाला?

रौप्यपदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या. “सध्या पदक मिळालं आहे. हातात तिरंगा आहे. मला खूप आनंद होत आहे. आणखी भरपूर काम करायचं बाकी आहे. बऱ्याच काळापासून मी दुखापतीचा सामना करतो आहे. दुखापतीमुळे जेवढ्या स्पर्धा खेळायला हव्यात तेवढ्या मी खेळू शकत नाहीये. दुखापतीमुळे मला माझ्या चुकांवर काम करता येत नाहीये. या चुकांवर काम झाल्यास चांगला परिणाम दिसेल,” अशा भावना नीरजने व्यक्त केल्या.

 

अजून खेळ संपलेला नाही, भरपूर काही बाकी आहे

तसेच पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शदने भाला फेकल्यानंतर मला मनातून वाटत होतं की आपण हे करू शकतो. मी आतापर्यंत 90 मीटरपर्यंत भाला फेकलेला नाही.पण मी हे करू शकतो असं मला अंतर्मनातून वाटत होतं. मी 89 मीटरपर्यंत भाला फेकू शकलो. माझी ही कामगिरी काही कमी नाही. पण तेच सांगतोय की खेळ अजून संपलेला नाही. आणखी खूप काही बाकी आहे. ज्याने सुवर्णपदक पटकावले त्याने मेहनत केली आहे, त्याच्या कामगिरीचे कौतुक करावेच लागेल, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली.

 

नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

नीरज चोप्राच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे. नीरजच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. नीरज पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरित करित राहील, असं मोदी म्हणाले. तर नीरजच्या या कामगिरीवर त्याची आई सरोज देवी यांनीदेखील आनंद व्यक्त केलाय. नीरज घरी आल्यावर मी त्याला त्याच्या आवडीचे जेवण खायला देणार आहे. त्याला मिळालेल्या पदकामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. ज्या खेळाडूला सुवर्णपदक मिळालं, तोदेखील माझ्या मुलासारखाच आहे, असे सरोज देवी म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -