इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील विविध विकासकामांसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नातून राज्य शासनाने नगरोत्थान महाभियानांतर्गत इचलकरंजी शहराच्या 51.95 कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पास मंजूरी दिली आहे. त्या संदर्भातील अध्यादेश शुक्रवारी (9 ऑगस्ट) नगर विकास विभागाने जारी केला आहे.
राज्यातील नागरी भागात मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने नगरोत्थान अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील विविध भागातील रस्ते आणि गटारी कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून आमदार प्रकाश आवाडे हे शासन दरबारी सातत्याने प्रयत्नशील होते. वेळोवेळी केलेल्या पाठपुुराव्याला यश मिळून राज्य शासनाने इचलकरंजी महानगरपालिका रस्ते विकास प्रकल्पास मान्यता देत त्या संदर्भातील अध्यादेशही जारी केला आहे. या सर्व कामात माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनीही सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.
नगरोत्थान महाभियानांतर्गत इचलकरंजी शहरातील विविध भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, क्राँकिटीकरण यासह गटारी आवश्यक त्याठिकाणी पूल बांधणे आदी कामांसाठी 51.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचा कायापालट होणार असून निवडणूकीमध्ये दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.