मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. असं असलं तरी ज्या महिलांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला योजनेचे पैसे येणार नाहीत त्यांचा मोठा भ्रनिरास होणार आहे. पण अशा महिलांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यांनादेखील या योजनेचा पहिल्या महिन्यापासून फायदा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगावात याबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “महिलांना मागे ठेवून कोणताच देश मोठा होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिलांना सक्षमीकरण करण्याचे काम आपण करत आहोत. बचत गट केवळ कगदावर राहणार नाही तर खऱ्या अर्थाने सक्षम करत आहोत. लाडकी बहीण योजनेवरुन कुणी म्हणाले, महिला विकत घेता का? लाच घेता का? नालायकांनो, बहिणीचे प्रेम आहे म्हणून लाडकी बहीण योजना. तुम्हाला संधी मिळाली तेव्हा तुम्ही का नाही दिले?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला.
“या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल. कारण त्यांना तुम्हाला दिलेले पंधराशे रुपये पोटामध्ये दुखत आहे. काहीजण मानतात. पंधराशे रुपये परत घेतले जातील. मात्र या देशात भाऊबीज दिलेली परत घेतली जात नाही. माय माऊलींची योजना कुणाचा बाप बंद करू शकणार नाही. कुणी पैसे परत घेऊ शकणार नाही. कोणी आढावा घेऊ शकणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘त्यांना तीन महिन्यांचे पैसे देऊ’
“ज्या महिलांचे आधार खाते बँक खात्याचे संलग्न नाही ते संलग्न करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्वांना पैसे मिळणार आहेत. काळजी करू नका. त्यामुळे ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील त्यांना दोन महिन्यांचे देऊ. तर सप्टेंबरपर्यंत जे अर्ज येतील त्यांना तीन महिन्यांचे पैसे देऊ”, अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
“तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसले आहेत. सावत्र भावांपासून सावधान राहा. तुमचे सख्खे भाऊ तुम्हाला कुठल्याही योजनेपासून वंचित ठेवणार नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. “महिला सक्षम झाल्या तर महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही. सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण करत आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
फडणवीसांचा मविआ नेत्यांवर निशाणा
“रोज हे नवनवीन खोटं सांगतात. हे खोटं सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दात सांगतो. काही लोक खोटं बोलून-बोलून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेत संविधान बदलल्याबद्दल खोटं विरोधकांनी पसरवलं. सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत कोणी आरक्षण संपवू शकत नाही. विरोधक निवडणुका आल्या की खोटं पसरवण्याचं काम करतात”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर निशाणा साधला