आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकींचे सत्रही सुरु आहेत. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळ यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार याची मला निश्चित खात्री आहे, असे वक्तव्य केले. तसेच यावेळी त्यांनी महाविकासआघाडीतील नेत्यांनाही टोला लगावला.
“आता घोडा मैदान जवळ आहे. मला स्वत:ला खात्री आहे की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार निश्चितपणे येईल. टाईम्सने केलेला हा सर्व्हे आठवडाभर किंवा दहा दिवसांपूर्वी केलेला असेल. त्या आधारावर जर तुम्ही कोणलाही बहुमत मिळणार नाही, असे दाखवत असाल तर मग आता लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात आल्यानंतर सर्वत्र जल्लोष केला जात आहे. अनेक ठिकाणाहून मला फोन येत आहेत. सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले.
पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार
“त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण, शेतकरी किंवा विद्यार्थ्यांसाठी ज्या काही नवीन योजना सुरु केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु झाल्यानतंर याचा परिणाम सकारात्मकरित्या महायुतीला होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार याची खात्री आहे”, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
महाविकासआघाडीचा तो घास नाही
यावेळी त्यांना महाविकासआघाडीने लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करु असे म्हटले आहे, त्यावर तुमचे मत काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी महाविकासाआघाडीवर जोरदार टीका केली. “लाडकी बहीण योजनेवर आधी तुम्ही टीका केली. तुम्ही हे पैसे कुठून आणणार, हे कसं काय शक्य आहे, यामुळे तुम्ही दिशाभूल करत आहात, अशी टीका महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली. मला त्यांना इतकंच सांगायचं की महायुतीचं सरकार हे करु शकतं. महाविकासआघाडीचा तो घास नाही”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.