Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्र“ज्या नराधमाने दुर्दैवी कृत्य केलं, त्याला…”; बदलापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे...

“ज्या नराधमाने दुर्दैवी कृत्य केलं, त्याला…”; बदलापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

“बदलापूरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या नराधमाने हे दुर्दैवी कृत्य केलं आहे, त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यावर तात्काळ दोषींवर कारवाई करावी”, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आज संतप्त बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे.

 

यावेळी त्यांनी “याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच अशाप्रकारच्या घटना यापुढे होऊ नये, म्हणून संस्था चालक, शाळा या सर्व लोकांवर एक नियमावली तयार केली जाईल, जेणेकरुन असे कृत्य यापुढे होणार नाही”, असे आदेश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.

 

“अशाप्रकारचे धाडस कोणी करणार नाही”

“मी याबद्दल पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्या आरोपीवर अनेक कलम तात्काळ लावावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावे. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यावर तात्काळ कारवाई करुन कठोर शिक्षा करण्यात यावी, असे आदेश मी दिलेले आहेत. मी याप्रकरणी कडक शिक्षा केली जावी, अशी सूचना केली आहे. जेणेकरुन पुन्हा अशाप्रकारचे धाडस कोणी करणार नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

“कडक कारवाई केली जाईल”

“त्यासोबतच याप्रकरणी संस्था चालकांचीही चौकशी केली जाणार आहे. अशाप्रकारे कर्मचारी ठेवताना संस्थाचालकांनीही त्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमीवर तपासायला हवी. त्यामुळे संस्था चालक किंवा जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या नराधमाने हे दुर्दैवी कृत्य केलं आहे, त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, असेही आदेश दिले आहेत. यापुढे शाळेत असा धक्कादायक प्रकार घडू नये, यासाठी निश्चितच एक नियमावली तयार केली जाईल. यात संस्था चालकांना काही नियम लागू करण्यात येणार आहे.

कोणतीही संस्था एखाद्या कर्मचाऱ्याला कामावर ठेवताना तो कर्मचारी नेमका कोण, त्याचे कोणत्या ठिकाणावरुन आला आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय, यासाठी आम्ही एक नियमावली तयार करु. तसेच हा जो काही प्रकार घडलेला आहे, त्यावर कडक कारवाई केली जाईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. यात जे कोणी दोषी असतील, त्या सर्वांवर योग्य ती कारवाई केली जाईल”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

 

“एक नियमावली तयार केली जाईल”

“तुमच्या मुली या आमच्याही मुली आहेत. आपण एकाच कुटुंबातील आहोत. यामुळे या अशाप्रकारच्या घटना यापुढे होऊ नये, म्हणून संस्था चालक, शाळा या सर्व लोकांवर एक नियमावली तयार केली जाईल, जेणेकरुन असे कृत्य यापुढे होणार नाही”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -