आजपासून पुढील तीन-चार दिवस राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या दक्षिण बांग्लादेशात कमी दाबाचे क्षेत्र कायम असून येत्या 24 तासांत ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा (Maharashtra Monsoon) आस असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे रायलसिमा आणि परिसरावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
यापार्श्वभूमीवर आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह (Heavy Rain Alert) जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भ मराठवाड्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.
याशिवाय वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. पुढील तीन-चार दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.