कोल्हापूर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून भाजपला लवकरच एक मोठा झटका मिळू शकतो. यामुळे कोल्हापूरमधील राजकीय समीकरणांची मांडणी नव्याने होणार आहे. कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील समजले जाणारे समरजीतसिंह घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. समरजीतसिंह घाटगे यांनी येत्या 23 ऑगस्टला कार्यकर्त्यंचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात समरजीत घाटगे आपला निर्णय जाहीर करु शकतात. मात्र, समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास तो भाजपसाठी मोठा धक्का ठरेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, समरजीत घाटगे यांनी शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतील, असे सांगितले जात आहे. प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मंगळवारी रात्री उशीरा तसे निरोप पाठवण्यात आले आहेत. याशिवाय, गुरुवारी कोल्हापुरात महायुतीची जाहीर सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहे. तरीही समरजीत घाटगे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
समरजीत घाटगे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरतील, असे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे हे शरद पवार गटात जातील, अशी चर्चा होती. आगामी विधानसभा निवडणुकीत ते तुतारीच्या चिन्हावर कागल मतदारसंघातून अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकतील, असा अंदाज आहे.
कागलमध्ये हसन मुश्रीफांचं टेन्शन वाढणार?
गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या वाटाघाटी सुरु होत्या. शरद पवार गटाने त्यांच्यासमोर तुतारीच्या चिन्हावर कागलमधून लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अजित पवार महायुतीत असल्याने कागलची जागा हसन मुश्रीफ यांच्या वाट्याला जाईल. त्यामुळे समरजीत घाटगे यांना संधी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती. सुप्रिया सुळे आणि समरजीत घाटगे यांच्यात सातत्याने बोलणी सुरु होती. स्वत: शरद पवार हेदेखील समरजीत घाटगे यांच्याशी बोलल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
समरजीत घाटगे यांच्याकडे कायम देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील नेता म्हणून पाहिले गेले आहे. त्यामुळे शरद पवारांची ही खेळी फडणवीसांसाठी मोठा धक्का असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.