,आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या, मराठी सिनेसृष्टीत खलनायिका म्हणून ओळख मिळवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज २७ ऑगस्ट रोजी निधन झालं.
आज मंगळवारी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मराठीसोबतच त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. 2011 मध्ये त्या रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटात दिसल्या होत्या. हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपटही ठरला. त्यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या बुधवारी अंतिम संस्कार होणार आहेत.
कोण होत्या सुहासिनी देशपांडे
सुहासिनी या मराठी सिनेसृष्टीला लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटात काम केलं. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी इंडस्ट्रीमध्येही नाव कमावलं. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी अभिनयाची सुरुवात केली होती. त्यांनी मागील ७० वर्षात १०० हुन अधिक चित्रपटात काम केलं. त्या खासकरून एक खाष्ट सासूच्या भूमिकेत दिसल्या. त्यानी अनेक चित्रपटात खलनायिकेची कामं केली. त्यामुळे त्यांना लोकप्रिय खलनायिका म्हणूनही ओळख मिळाली होती. आता त्यांच्या अशा अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सुहासिनी या मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव होत्या. त्यांनी मराठीमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. यामध्ये मानाचं कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), मी शपथ (2006) आणि चिरंजीव (2016) या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोनीश पवार दिग्दर्शित ‘धोंडी’ या चित्रपटातही त्या दिसल्या होत्या. त्या एन. रेळेकर दिग्दर्शित 2017 चा मराठी चित्रपट ‘छंदा प्रीतीचा’ आणि 2019 चा ‘बाकाल’ या चित्रपटाशीही त्या जोडल्या गेल्या होत्या.