क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप 2023-2025 या साखळी फेरीच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन तारीख जाहीर केली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार महाअंतिम सामना हा 11 जून ते 15 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे सलग तिसऱ्यांदा इंग्लंडमध्ये करण्यात आलं आहे. हा महामुकाबला लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड या ऐतिहासिक स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
तसेच आयसीसीने खबरदारी म्हणून 1 दिवस राखीवही ठेवला आहे. 16 जून हा राखीव दिवस असणार आहे. सद्यपरिस्थितीनुसार सलग आणि एकूण दुसऱ्यांदा टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मानाच्या गदेसाठी हा महामुकाबला होऊ शकतो.
इंडिया-ऑस्ट्रेलिया फायनल मुकाबला होणार?
कसोटी क्रिकेटचा वर्ल्ड कप अंतिम सामना हा टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे. ताज्या आकडेवारीनुसार, wtc पॉइंट्स टेबलमध्ये दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. टीम इंडियाने या साखळीतील 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही 68.52 इतकी आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या तुलनेत 3 सामने जास्त खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. कांगारुंची विजयी टक्केवारी ही 62.50 इतकी आहे. न्यूझीलंड तिसर्या तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियाला या साखळीतील अजून 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 2, न्यूझीलंड विरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 असे एकूण 10 सामने खेळणार आहे. आता या सामन्यांच्या निकालावर सर्व काही अवलंबून असणार आहे.
आयसीसीकडून wtc Final 2025 ची तारीख जाहीर
रोहित कसोटीत वर्ल्ड कप जिंकवणार?
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकला. रोहितने भारताला 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कप तर 13 वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने याआधी एकूण 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीतपर्यंत धडक मारली. मात्र 2021 मध्ये न्यूझीलंड आणि 2023 साली ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेतेपदावरच समाधान मानवं लागलं. त्यामुळे आता रोहित तिसऱ्यांदा टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचवून ही ट्रॉफी जिंकवणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.