Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रएसटीच्या संपावर आज निघणार तोडगा? मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवली तातडीची बैठक

एसटीच्या संपावर आज निघणार तोडगा? मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवली तातडीची बैठक

एसटी कर्मचारी कृती समिती संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे. एसटीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. आता या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीची बैठक बोलवली आहे. त्यामुळे आज या एसटीच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर काल मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घ्या, असे आवाहन केलं. ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको. त्यामुळे संप मागे घ्या, असे उदय सामंत यांनी म्हटले. पण एसटी कर्मचारी हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसोबत झालेली सरकारची ही बैठक निष्फळ ठरली आहे.

 

त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी कर्मचारी कृती समितीसोबत बैठक होणार आहे. आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्‍यांसमोर एसटी कर्मचारी आपल्या मागण्या मांडणार आहे. त्यामुळे आता या बैठकीत काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

एसटी कृती समितीचे संदीप शिंदे काय म्हणाले?

“संप करण्यात आम्हालाही आनंद नाही. आम्ही अनेकजण उत्सवाच्या काळात आपल्याला सेवा देत असतो. कोरोना काळातही सेवा बंद असताना आम्ही नागरिकांना राज्याच्या सीमेवर सोडलं. प्रवाशी हा आमचा देव आहे. मात्र आमच्याही घरी मुलं बाळं आहे. आमच्यावरील अन्यायाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे करत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी प्रतिक्रिया एसटी कृती समितीचे संदीप शिंदे यांनी दिली.

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे. त्यासोबतच मूळ वेतनात जाहीर केलेल्या 5000, 4000 आणि 2500 रुपयांऐवजी सरसकट 5000 हजार रुपये मिळावेत, अशी मागणी एसटी कर्माचाऱ्यांकडून केली जात आहे.

 

1. खाजगीकरण बंद करा.

 

2. सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा.

 

3. इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा.

 

4. जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा.

 

5. चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या

 

6. वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.

 

7. सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी..

 

8. विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या.

 

या व इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर कराव्यात, असे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -